पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. मेट्राचे दोन मार्ग सुरु झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणी मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. मेट्रो प्रकल्पाच्या या कामांमुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामुळे आता पुणेकरांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरातील मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांकडून वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठ ते शिवाजी नगर संचेती चौक या दरम्यान पाच मेट्रोच्या स्टेशनची कामे सुरु होणार आहे. यामुळे ससून रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पुणे विद्यापीठ ते शिवाजी नगर संचेती चौक दरम्यान बदल करण्यात आला आहे. तसेच औंध, बाणेर वाकड या रस्त्यावरून गणेश खिंड विद्यापीठ मार्ग विद्यापीठ चौकातून जाणाऱ्या रस्त्यासाठी बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
विद्यापीठ चौकातून खडकी रेंज हिल मार्गे शिवाजी नगर संचेती चौकाकडे जाता येईल. मात्र संचेती चौक शिवाजी नगरकडून पुणे विद्यापीठाकडे जाणारा गणेश खिंड रस्ता नेहमी प्रमाणे सुरु राहील.
पुणे मेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट हा भूमीगत मार्ग जून महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. या मार्गावर महिन्याभरापूर्वी चाचणी यशस्वी झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा मार्ग अजून सुरु झालेला नाही. आता ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर हा मार्ग सुरु करण्याचा हालचाली वेगाने होणार आहे. हा मार्ग ३१ मार्चपर्यंत सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
केंद्र सरकारने पीसीएमसी ते निगडी मार्गाच्या विस्तारास मंजुरी दिली आहे. परंतु स्वारगेट ते कात्रज मार्गाच्या विस्तारास अजून मंजुरी दिली नाही. या मार्गाच्या मंजुरीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे जाणार आहे.