विनय जगताप, भोर, पुणे | 21 जुलै 2023 : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट रस्ता बंद करण्यात आला आहे. हा घाट अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच हवामान विभागाकडून जेव्हा जेव्हा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहे.
सध्या पुणे परिसरातील घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरु आहे. यामुळे अनेकवेळा अचानक दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. तसेच वृक्ष उन्मळून पडणे, रस्ता खचून जाणे, माती वाहून जाणे हा प्रकारही होतो. यामुळे प्रशासनाने संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. वाहन धारकांना वरंधा घाट बंद झाल्यामुळे ताम्हिनी घाटाचा पर्याय आहे. हा घाट वरंधा घाटापेक्षा अधिक सुरक्षित आहे. वरंधा घाटावरुन महाडला जाण्यास कमी वेळ लागतो. यामुळे वाहन धारका या घाटाने प्रवास करतात.
वरंधा घाटाच्या मार्गावर अरुंद रस्ते आहेत. तसेच अचानक वळणे अनेक आहेत. यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात या भागात अनेकदा अपघात घडतात.
पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट रस्ता 22 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बंद असणार आहे. यासंदर्भातील आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले आहेत. यामुळे या मार्गावरुन जाताना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे.
पुण्यातल्या भोर तालुक्यातील रस्ते खराब झाले आहेत. खड्यांचं साम्राज्य या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. या भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेक लहान, मोठे अपघातही होत आहे.