पुणे | 13 ऑगस्ट 2023 : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी (Traffic Issue) ही एक गंभीर समस्या बनली आहे. सुट्या आल्या की महामार्ग ठप्प होत असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहेत. त्यातच पावसामुळे मागील महिन्यात दरड कोसळण्याच्या घटना झाल्या होत्या. त्यामुळे तीन, चार वेळा वाहतूक कोंडी गेल्या महिन्यात झाली होती. त्यानंतर जुलै महिन्यात एक्स्प्रेस वे वर अपघात झाले. यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच सलग सुट्या आल्यानंतर वाहतूक कोंडी निर्माण होत असते.
शनिवार, रविवार अनेक जणांना सुट्या असतात. त्यामुळे दर शनिवार, रविवारी पुणे-मुंबई एक्स्प्रेवर वाहतुकीची कोंडी असते. त्यानंतर यावेळी मंगळवार, बुधवार सुट्टया आल्या आहेत. मंगळवारी १५ ऑगस्ट तर १६ ऑगस्ट रोजी पारशी नूतनवर्षाची सुटी आल्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडले. एकाच वेळी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडल्यामुळे शनिवारी वाहतूक कोंडी झाली होता. आता रविवारसुद्धा वाहतुकीची कोंडी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आणि जुन्या मार्गावर झाली आहे.
मुंबई, पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारपासून वाहतूक कोंडी कायम आहे. या मार्गावर सुमारे दीड किलोमीटरपर्यंत रांगा बोरघाटात लागल्या आहेत. बोरेघाटातील अमृताजन कमानपासून खोपोलीकडे वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. तब्बल 24 तास उलटूनही ही वाहतूक कोंडी कायम आहे. विकएंडबरोबर 15 ऑगस्ट आणि पारसी न्यू इयरच्या सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक मुंबईबाहेर पडले आहेत.
मुंबई, पुणे एक्स्प्रेस वेवरली वाहतूक कोंडीमुळे आता नवीन प्रकल्पावर चर्चा सुरु झाली आहे. ४० हजार क्षमतेच्या या महामार्ग सध्या रोज ६० हजार वाहने जात आहे. तर शनिवार अन् रविवार ८० ते ९० हजारांवर वाहने धावतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. दोन लेन वाढवून महामार्गाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच यावर मार्ग निघणार आहे.