पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात वाहतूक कोंडी (Pune Traffic Issue) ही मोठी समस्या आहे. त्यावर मार्गच सापड नाही. हाच प्रकार आता पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे संदर्भात होत आहे. पुणे शहराप्रमाणे पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Pune-Mumbai Expressway) वाहतूक कोंडी हा नेहमीचा विषय झाला आहे. देशातील पहिल्या दहा एक्स्प्रेस वे मध्ये या मार्गाचा समावेश आहे. तसेच या मार्गावर टोल सर्वाधिक आहे. त्यानंतरही सतत वाहतूक कोंडी होत असते. रविवारी पुन्हा पुणे आणि मुंबईच्या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहे.
पुणे, मुंबई द्रुतगती मार्ग पुन्हा मंदावला आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे रविवारी वाहतूक कोंडी जाणवत आहे. रविवारची सुटी आणि सोमवारी महात्मा गांधी जयंतीची सुटी आहे. यामुळे चाकरमाने गावी निघाले आहेत. मोठ्या संख्येने लोक गावी जात असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तसेच अनेक जण गणपती बाप्पाला निरोप देऊन मुंबईला पोहचत आहेत. दोन्ही बाजूंनी महामार्गावर ताण आल्याने बोरघाटात वाहतूक मंदावली आहे. परिणामी वाहनांच्या लांबचलांब रांगा पाहायला मिळत आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 2004 मध्ये सुरु झाला. हा एक्स्प्रेस वे तयार झाला त्यावेळी दर तीन वर्षांनी 18% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तेव्हापासून दर तीन वर्षींनी दरवाढ होत आहे. आता 1 एप्रिल 2023 पासून पुन्हा टोल वाढवण्यात आला. यामुळे या महामार्गावरुन देशात सर्वाधिक टोल द्यावा लागत आहे. कारसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रतिकिलोमोटीर 1.73 रुपये टोल आकारला जातो तर या मार्गावर 3.40 रुपये प्रतिकिलोमीटर टोल द्यावा लागत आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सहा पदरी महामार्ग आठ पदरी करण्या प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच बोरघाटात आणखी दोन बोगदे करण्याचाही प्रस्ताव तयार केला आहे.