पुणे : पुणेकरांसाठी महत्वाचा असणारा चांदणी चौकातील वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे. काही दिवसासांठी ही वाहतूक बंद असली तरी पुणेकर नागरिकांना चांगली सुविधा त्यानंतर मिळणार आहे. येत्या ४ ते १५ जुलैपर्यंत महामार्गावरील वाहतूक मर्यादीत कालावधीसाठी बंद राहणार आहे. चांदणी चौकात होणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलासाठी गर्डर उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
पुणे येथील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात उड्डाण पुल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे गर्डर उभारणीचे काम ४ ते १५ जुलै २०२३ या दरम्यान करण्यात येणार आहे. हे काम रात्री १२.३० ते पहाटे ३.३० दरम्यान करण्यात येणार आहे. यामुळे तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक महामार्गालगत असणाऱ्या पर्यायी रस्त्यांवर म्हणजे साईड रोडने वळवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
पुणे येथील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे काम सबस्ट्रक्चपर्यंत करण्यात आले आहे. यामुळे मुख्य महामार्गावरील वाहतूक रात्री तीन तास बंद करुन पर्यायी रस्त्यांवरुन होणार आहे. तीन तासांसाठी मल्टी ऍक्सेल वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे, तळेगाव टोल नाका अन् मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोल नाका या ठिकाणीच मल्टी ऍक्सेल वाहने थांबवली जातील. तसेच साताराकडून येणारी वाहने खेड शिवापूर टोल नाका येथे थांबवण्यात येणार आहेत. परंतु हलकी वाहने, बस आणि ट्रक पर्यायी रस्त्याचा वापर करतील.
मुंबईकडून साताराकडे जाण्यासाठी सेवा रस्ता रॅम्प-6 चा वापर करता येणार आहे. तसेच मुंबईवरुन कोथरुडकडे जाण्यासाठी हाच मार्ग वापरता येईल. तसेच सातारा अन् कोथरूडमार्गे मुंबईकडे जाण्यासाठी वेदभवन बाजूने सेवा रस्ता व रॅम्प-8 चा वापर वाहनधारकांना करता येणार आहे.