देहू, पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी (Sant Tukaram maharaj palkhi) सोहळा 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी प्रस्थानापूर्वी चांदीच्या पालखी रथाला चकाकी देण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर पालखी रथ (Chariot) पंढरपूरकडे जाणार असल्याने चकाकी देण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड येथील घनश्याम गोल्ड्स यांच्याकडून ही सेवा दिली जाते. वारी परंपरा ही जातीपाती आणि धर्माच्या पलीकडचा धार्मिक सोहळा आहे. नेमका हाच सौहार्द रथाच्या चकाकीच्या कामातही पाहायला मिळत आहे. कारण रथाची चकाकी देण्याचे काम मुस्लीम कारागीर (Muslim artisans) मोठ्या श्रद्धेन करत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाची वेळ जसजशी जवळ येवू लागली आहे, तसतशी कारागीरांची लगबगही पाहायला मिळत आहे. रथाला चकाकी देण्याचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 जूनला पुण्यातील देहू नगरीत येणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान हे वारकरी संप्रदायला संबोधित करणार आहेत. त्यासाठीच्या मंडपाचे भूमिपूजनही नुकतेच पार पडले. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडविल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरल्या आणि वर आल्या. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केले नाही आणि 13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर (दगडावर) बसले होते ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केली आहे, म्हणून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जाते.
संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला प्रस्थान ठेवेल. यावेळी वारकऱ्यांसाठी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज अशा दोन्ही आषाढी पालखी सोहळ्यात कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मिळणार आहेत. कोरोनामुळे दोन वर्ष सोहळा पायी साजरा झाला नाही. यंदा होत आहे, त्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. पालखी सोहळ्यादरम्यात पालखी मार्ग, पालखी तळ, रिंगण ठिकाणी पाणी, आरोग्य, स्वच्छतेसोबत वारकरी भाविकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा किंवा बूस्टर डोस घेतला नसले तर पालखी सोहळ्यात देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.