मनोज गाडेकर, अहमदनगर : साईबाबांच्या शिर्डीतही व कोल्हापूर येथील मंदिरावर मराठी नववर्षाचे स्वागत मंदिरावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून करण्यात आलंय. गुढी आणि नवीन पंचागांचे विधीवत पूजन करून साईबाबांच्या मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आलीय. सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत वर्षभरातील प्रत्येक सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरी करण्याची परंपरा आहे.. आज मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत आहे. आज साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रूपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळा परिधान करण्यात आली आहे. साईदर्शनाने नववर्षाची सुरूवात करण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलीय.
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात उभारली गुढी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. साडे तीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक मुहूर्त असल्याने व मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने देवीची अलंकार पुजा करण्यात आली.
देवीची पहाटे आरती करुन तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आला. तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा, वाकोजी बुवा यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण केला. तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. देवीच्या विधिवत पुजा झाली.
देवीला शिवकालीन अलंकार
साडे तीन शुभ मुहूर्तापैकी आज गुढीपाडवा एक मुहूर्त असल्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले शिवकालीन अलंकार घालण्यात आले. यात जय भवानी , राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आलेली सोन्याची माळ,मोती माणिक व रत्नजडीत जरी टोप त्यावर महादेवाची पिंड,मंगळसूत्र असे हे अलंकार घालण्यात आले त्यानंतर पाडवा वाचन करण्यात आले.
भाविकांची गर्दी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुढी उभारून मराठी नववर्षाची सुरुवात विधिवत पूजा करून करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेलं अलंकार हे प्राचीन व विशेष आहेत. देवीला गुडीपाडवा शुभ मुहूर्तावर हे अलंकार घालण्यात येतात. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शारदीय व शाकंबरी नवरात्र उत्सवासह गुढीपाडवा, रंगपंचमी, बैलपोळा, नागपंचमी हे धार्मिक सण साजरे केले जातात त्यावेळी विशेष अलंकार पूजा केल्या जातात त्यारूपात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली असते.