पुणे | 7 मार्च 2024 : लोणावळ्यातून शरद पवारांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंना इशारा दिलाय. माझ्या कार्यक्रमाला जावू नये म्हणून, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्थानिक आमदारानं दमदाटी केली. यापुढं दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला अशा कडक शब्दात ठणकावत सोडणार नाही असं पवार म्हणतायत. आपण कोणालाही धमकी किंवा दमदाटी केलेली नाही. एक व्यक्ती तरी पुरावा म्हणून समोर आणा. नाही तर शरद पवार खोटे बोलले असं महाराष्ट्रात सांगणार असा पलटवार शेळकेंनी केला. तसंच लोणावळ्यातल्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांची संख्याच नसल्यानं शरद पवारांना खोटी माहिती देण्यात आली. त्याआधारे पवारांनी माझ्याबद्दल वक्तव्य केल्याचं शेळके म्हणतायत. तर नेमकं काय घडलं त्यासंदर्भात सुनील शेळकेंशी बोलून प्रतिक्रिया देणार असं अजित पवार म्हणालेत. मात्र शरद पवारांनी अशा प्रकारे आमदाराला धमकी देणं बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलीय.
सुनील शेळके मावळचे आमदार आहेत आणि ते अजित पवारांच्या गटात आहेत. शरद पवारांचा कार्यक्रम त्यांच्याच मतदारसंघातल्या लोणावळ्यात होता. या कार्यक्रमात 137 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा शरद पवारांच्या गटात प्रवेश करुन दादा आणि शेळकेंना धक्का दिल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, फक्त 37 कार्यकर्त्यांचाच प्रवेश झाला असून तेही अजित पवार गटाचे नव्हतेच असा दावा शेळकेंनी केलाय.
दमदाटीवरुन शरद पवारांनी दादांचे आमदार शेळकेंना खडसावलं. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीतही पवारांनी दत्तामामा भरणेंसाठी इंदापुरात सभा घेतली होती आणि त्यावेळी पवारांनी दमदाटी केल्यास जागा दाखवू असा दम पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांना भरला होता.
आता शरद पवारांच्या टार्गेटवर सुनील शेळके आलेत. अर्थात दमदाटी केली असं सांगणारा एक तरी समोर आणा असं प्रतिआव्हान शेळकेंनी दिलंय. त्यामुळं हा वाद जिवंत आहे.