पुण्यात एकाच नंबरच्या दोन रिक्षा, नेमकी भानगड काय? पोलिसांनाही चक्रावणारा धक्कादायक प्रकार

| Updated on: May 23, 2023 | 7:11 PM

पुण्यातुन हा अजब प्रकार समोर आला आहे. जेव्हा एकाच नंबरच्या दोन रिक्षा पुण्याच्या रस्त्यांवर फिरतांना दिसल्या. आझाद रिक्षा असोसिएशने याची दखल घेत त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुण्यात एकाच नंबरच्या दोन रिक्षा, नेमकी भानगड काय? पोलिसांनाही चक्रावणारा धक्कादायक प्रकार
Follow us on

पुणे : हा अजब प्रकार पुण्यात घडला, ज्यात एकाच नंबरच्या दोन रिक्षा फिरत असल्याचे समोर आले. MH 12 AQ 1080 असा या रिक्षाचा नंबर असून पिंपरी खुर्द,पुरंदर या तालुक्यातील राजेंद्र चंद्रकांत बोऱ्हाडे हे त्या रिक्षाचे मालक आहेत. त्यांना ट्राफिक पोलिंसाकडून नियम मोडल्याचा आणि 1000 रुपये दंडाचा आलेला मेसेज वाचून धक्काच बसला. त्यांनी ई-चलानाची तपासणी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, कोणीतरी त्यांच्या रिक्षाचा नंबर वापरुन खडकी पोलीस चौकीच्या आसपास रिक्षा चालवत आहे. हे बघून त्यांना धक्काच बसला. राजेंद्र बोऱ्हाडे हे पुरंदरमध्ये रिक्षा चालवतात. त्यांची रिक्षा कधीच पुण्यात येत नाही.

राजेंद्र बोऱ्हाडे यांनी याची माहिती आझाद रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष शफीकभाई पटेल यांना दिली.यानंतर या दोघांनी खडकी ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क साधून सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत लक्ष्मण खसेत्री यांना संपूर्ण प्रकार सांगितला.पोलिसांनी त्यांना या प्रकरणी आरोपी विरोधात कडक कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. MH12 AQ 1080 हा क्रमांक त्यांच्या रिक्षाचा असूनही पुण्यात कोणीतरी त्यांच्या रिक्षाचा नंबर वापरत आहे.

ई-चलन तपासात धक्कादायक खुलासा

ई-चलन तपासल्यानंतर ती रिक्षा पुण्यात अवैधरित्या व्यवसाय करत असल्याचे निदर्शनात आले. खोटी नंबर प्लेट लावून ही रिक्षा पुण्यात किती दिवसांपासून फिरत आहे? याचाही तपास केला जात आहे. जर या रिक्षांचा अपघात झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जबाबदारी कोणाची?

बनावट रिक्षा क्रमांक वापरुन काही टोळ्या या व्यवसायात सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. या रिक्षांचा अपघात झाल्यास जबाबदार कोणाला धरले जाईल? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच आझाद रिक्षा चालक संघटनेने परिवहन विभागाच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली आहे.

अजून बनावट रिक्षा असण्याचा संशय

हे प्रकरण उघडकीस आल्याने पुण्यात अजून अशा बनावट रिक्षा असू शकतात, असा संशय आहे. दिवसेंदिवस पुणे शहरात लोकसंख्या वाढत असून सार्वजनिक वाहतूक तोडकी पडत आहे. यातच खाजगी वाहतुकीला अनेक अर्थांनी महत्त्व आलं आहे. जर अशाप्रकारे बनावट रिक्षा पुणे शहरात फिरत असतील तर ही गंभीर बाब आहे.

काय म्हणाले राजेंद्र बोऱ्हाडे?

” मला ई-चलनाचा मेसेज आल्यानंतर धक्काच बसला. व्यवस्थित तपास केला असता असे समजले की ई-चलनामध्ये दाखवलेली रिक्षा वेगळीच आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे, की त्यांनी लवकरात लवकर या विरुध्द उपाययोजना करुन बनावट रिक्षा चालकाविरुद्ध कडक कारवाई करावीठ, अशी प्रतिक्रिया रिक्षा चालक राजेंद्र बोऱ्हाडे यांनी दिली.