चाकण- पुण्यातील चाकण-आंबेठाण रस्त्यावर कोरेगाव फाटा येथे भरधाव मालवाहू गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. चाकणच्या झित्राईमळा येथील 3 युवक होंडा दुचाकी एम.एच.14 जे.जे. 3172 वरून औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामावर जात असताना ही घटना घडली आहे . घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अशी घडली घटना
आंबेठाण गावाच्या हद्दीतील राजमुद्रा ट्रेडर्स समोर भरधाव मालवाहू गाडीने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. धडक इतकी भयानक होती की दुचाकीवरील दोघेजण उडून रस्त्यावर पडले. या घटनेत दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. केतन माणिकराव धोंडगे (वय.19 वर्षे ) आणि विलास आनंदराव घुले (वय.22वर्षे, ) यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील गोरख जकाते अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार असुर आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेनंतर मालवाहू गाडीच्या चालक राहुल पोपट वाळूंजकर , (मावळ ) घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच घटनास्थळावरील नागरिकांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चालकावर म्हाळूंगी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण अधिक तपास करीत आहेत.