संतोष नलावडे, सातारा : सातारा नगरपालिका निवडणूकजवळ आली की सातारा शहरात राजकारण सुरु होते. सातारा विकास आघाडीचे खा.उदयनराजे भोसले आणि नगरविकास आघाडीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरु होतात. आता ते पुन्हा सुरु झाले आहेत. सध्या सातारा नगरपालिकेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे.साताऱ्यातील अनेक विकास कामे वचन नाम्यानुसार मार्गी लागले असल्याचे खासदार उदयनराजे सांगत आहेत. मात्र नगरपालिकेवर उदयनराजेंची सत्ता आल्यापासून साताऱ्यात कोणतीही विकास कामे झाली नसल्याचा आरोप शिवेंद्रराजे यांनी केला आहे. सातारा विकास आघाडीने भ्रष्टाचार करून पैसे खाल्ले असल्याचे ही यावेळी आ.शिवेंद्रराजे म्हणालेत.
शिवेंद्रराजे भोसले यांना आव्हान
या आरोपावर उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांना प्रतीआव्हान दिलय. समोरासमोर येऊन भ्रष्टाचार कुठे केला याचा पुरावा द्या. मी कधीही पैसे खाल्लेले नाहीत, असे असेल तर मी माझ्या मिशाच काय भुवया काढेन. अजिंक्यतारा समूहातून अनेक भ्रष्टाचार आमदार शिवेंद्रराजे यांनी केले आहेत. असे लोक मोठ्या घरात जन्माला आले कसे असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केलाय.
उदयनराजे यांना विरोध राहणार
आरोपांवर आमदार शिवेंद्रराजे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजेंना बुद्धीचा भाग नाही. त्यांचा कमिशनचा धंदा आहे. पालिकेत त्यांनी काय दिवे लावलेत हे सर्व सातारकरांना माहीत आहेत. त्यांनी मिशा भुवया काढल्या तरी काही फरक पडणार नाही. मी कसा घरंदाज आहे, हे सर्वांना माहीत आहे. यापुढील निवडणुकीत माझा त्यांना विरोध कायम राहील, असा इशारा यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे
आमदार शिवेंद्रराजे भोसले
आतापर्यंत सातारा नगरपालिका निवडणूक आली की, या दोन्ही राजेंचे वाद हे कायम सातारकरांना अनुभवायला मिळतात. यामध्ये दोघेही एकमेकांची खालच्या पातळीला जाऊन टीका करत असतात. मात्र हीच निवडणूक संपली की दोघांमधील वैर संपलेले पाहायला मिळते.
अजिंक्यतारा कुक्कुटपालन, अजिंक्यतारा बाजार समिती, बँका, महिला बँक आणि इतर अनेक संस्थांद्वारे यांनीच लोकांचे पैसे खाल्ले, असा आरोप उदयनराजे यांनी केला. ते म्हणाले, दुर्दैवाने मला सांगावसं वाटते की, असे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आले तरी कसे? आमच्या दारात कधी कोण आले नाही. आई-बहिणींवरून कोणी आम्हाला शिव्या दिल्या नाहीत, असा टोला त्यांनी शिवेंद्रराजे यांना लगावला.