सातारकरांनी आज एक सुखद अनुभव घेतला. निमित्त होतं शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस. शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजे भोसले आले होते. यावेळी उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांना वाकून नमस्कार केला. उदयनराजे यांनीही शिवेंद्र राजे यांच्या खांद्यावर हात ठेवूनच मीडियाशी संवाद साधला. बऱ्याच काळानंतर दोन्ही राजेंना अशा पद्धतीने एकत्र पाहून सातारकरही भारावून गेले असतील.
शिवेंद्रराजे भोसले यांचा आज वाढदिवस होता. या निमित्ताने उदयनराजे भोसले यांनी त्यांना घरी येऊन शुभेच्छा दिल्या. उदयनराजे यांनी पुष्पगुच्छ देऊन शिवेंद्र राजे यांना शुभेच्छा देताच शिवेंद्रराजे यांनीही आपल्या मोठ्या बंधूंना वाकून नमस्कार केला. त्यानंतर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांनी मीडियाशी संवाद साधला. उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर हात ठेवूनच मीडियाशी संवाद साधला. शिवेंद्रराजे यांनी खूप मोठं व्हावं. दीर्घायुषी व्हावं. आयुष्यात यशस्वी व्हावं. त्यांच्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करणार. आमची भेट राजकीय नाही. मी राजकीय बोलत नाही. मी जे काही करत आलोय ते मनापासून करत आलोय. आताही मनापासूनच करणार. आज जे काही चाललंय. त्यासाठी ही काळाची गरज आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
तुम्ही आमचे लहानपणीचे फोटो पाहिले का? लहानपणी शिवेंद्रराजे यांच्या पायी मी काकींचा खूप मार खाल्लाय. असू दे, असं उदयनराजे यांनी म्हणताच एकच हशा पिकला. स्वत: उदयनराजे आणि शिवेंद्रराजेही दिलखुलास हसले.
माझ्याकडून अनावधानाने काही चुकलं असेल तर माफी मागणार नाही, पण दिलगिरी व्यक्त करतो. जिल्हा आणि महाराष्ट्राकडे शिवेंद्रराजे यांनी पाहावं. आयुष्यात प्रत्येकाने कुठे तरी थांबायला शिकलं पाहिजे. आज ते 50 वर्षाचे झाले आहेत, असं उदयनराजे म्हणाले. यावेळी महाराज तुमचं वय काय? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर माझ्या वयाचं काढू नको. कधी तरी बसू तेव्हा या गोष्टी बोलू, असं उदयनराजे यांनी म्हणताच पुन्हा खसखस पिकली. बाबांचे फोटो पाहिले. फक्त एकच चुकलं. म्हणलं. थोडी स्माईल असती बरं झालं असतं. आता आमचा फोटो काढा आणि लावा. मी सर्व बॅनर लावतो, असं म्हणतानाच शिवेंद्र राजे माझ्या हृदयात आहेत. मरेपर्यंत हृदयात राहतील, असंही त्यांनी सांगितलं.
शिवेंद्रराजे यांनीही यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकीय विषय वेगळे असतात. घरातील विषय वेगळे असतात. साताऱ्यातील राजघराण्यातील उदयनराजे हे सर्वात ज्येष्ठ आहेत. त्यांचा आशीर्वाद दहा हत्तींचं बळ देणारा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या माध्यमातून त्यांच्यासोबत आहोत आणि कायम राहणार. वरून लवकर निर्णय जाहीर व्हावा. त्यांचं काय वर चाललंय मला माहीत नाही. सातारा जावळीच्या पलिकडे मी काही जात नाही. त्यांनी दिल्लीतून शिक्कामोर्तब करून घ्यावं, असं शिवेंद्रराजे म्हणाले.