प्रदीप कापसे, Tv9 प्रतिनिधी, पुणे | 15 फेब्रुवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. तसेच या प्रकरणात दहाव्या शेड्यूलनुसार कारवाई करता येणार नाही, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं. दोन्ही गटांनी पक्ष सोडलेला नाही. दोन्ही गट पक्षावर दावा करत आहेत. हा पक्षांतर्गत वाद आहे. पक्षातील दोन गटात हा वाद आहे. पण पक्षात फूट पडलेली नाही, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं. विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली.
“आजचा निकाल हा घटनेचं अध:पतन आहे. दहावं शेड्यूल कायदा का आणला? की पक्षांतरबंदी व्हावी म्हणून. हा कायदा भक्कम झाला पाहीजे. आमदारांवरून जर पक्ष ठरत असेल तर हे लोकशाहीला धोकादायक आहे. नवीन शब्दांचा शोध आज लावला आहे. कदाचित त्यांना त्याचा अर्थ माहीत नसावा. आता सगळी जबाबदारी ही सुप्रीम कोर्टावर आहे. दुसऱ्या पक्षात त्यांचं स्वागत होतं. इथे लोकशाहीचं अध:पतन सुरु झालं आहे”, अशी टीका उल्हास बापट यांनी केली.
“शेवटचं कोर्ट हे जनता आहे. निवडणुका आहेत. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली तेव्हा त्यांना सत्तेवरुन लोकांनी दूर केलं. आता ठाकरे गट बरोबर की शिंदे गट बरोबर आहे किंवा शरद पवार गट बरोबर आहे की अजित पवार गट बरोबर आहे? हे जनता ठरवेल”, असं उल्हास बापट म्हणाले.
“आज वेगळं बोलण्याची गरज नाही. इंग्लंडमध्ये अध्यक्ष हा पक्षाचा राजीनामा देतो. अध्यक्ष हा अंपायर असतो. मात्र आपल्याकडे राजकीय पक्षाचा अंपायर असतो. राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांवरची विश्वासार्हता कमी होत चालली आहे. विश्वास कमी होत आहे. पक्षीय बलबाल, घटना काय आहे विचारसरणी काय आहे आणि सभागृहातील बहुमत पाहून ठरवावं. घटनेचं अध:पतन होत आहे. घटनेत लिहिलेला कायदा दुसरीकडे राहतो”, अशी भूमिका उल्हास बापट यांनी मांडली.
“पंतप्रधान यांना पूर्ण बहुमत असतं तेव्हा सगळ्या यंत्रणा सोबत असतात. राज्यपाल चुकला, स्पीकर चुकला तर कोर्टात जाता येईल. मागचा निकाल देताना पळवाटा या सुप्रीम कोर्टाने ठेवल्या होत्या. इंट्रपाट्री आणि इंटर पार्टी असे दोन वेगवेगळे शब्द वापरले आहेत. कदाचित याचा अर्थ हा नार्वेकरांना माहीत नसावा”, असा टोला घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी लगावला.