पुणे : पुणे शहरातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. संत ज्ञानेश्वर यांच्यासह जे काही समकालीन संत होते, त्यांनी याठिकाणी भजन, कीर्तन केले. संत एकनाथांच्या गाथेत याचा उल्लेख आहे, असा दावा मनसेकडून केला गेला. तो वाद अजूनही संपला नाही. त्याचवेळी पुण्यात पुन्हा मजारचा वाद निर्माण झाला आहे. पुणे शहरातील पर्वती मंदिराच्या पायथ्याशी अनधिकृत मजार आढळली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हिंदू संघटना आक्रमक
पर्वती मंदिराच्या पायथ्याशी अनधिकृत मजार आढळली आहे. या मजारीचा इतिहास स्पष्ट नाही. अनधिकृत मजारी विरोधात भाजपसह हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. भाजपच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात वनाधिकारी राहुल पाटील यांची भेट घेतली आहे. अनधिकृत मजारवर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये यासाठी मजारीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
ती जागा वनविभागाची
ज्या जागेवर ही मजार आहे ती जागा पर्वती देवस्थानाची नाही, असे देवस्थानाकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे. ही जागा वनविभागाची असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. यामुळे भाजपच्या शिष्टमंडळाने वनविभागाला निवेदन दिले आहे. त्या मजारवर कारवाई करा, अशी मागणी भाजपकडून केली आहे. दरम्यान वनविभागाकडून भाजपचे निवेदन स्वीकारले असून चौकशी सुरू केली आहे. तसेच मजार अनधिकृत असल्यावर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन वनविभाग अधिकाऱ्यांनी दिले आहे.
मंदिराचा काय होता वाद
पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला होता. पुण्यात बडा अरब म्हणून एक सरदार आणि त्याच्याबरोबर दोन धर्मप्रसारक आले. सलाउद्दीन आणि इस्माउद्दीन अशी त्यांची नावे होती. त्यांनी ही मंदिरे नष्ट केली आणि त्याठिकाणी दर्गे उभारले. त्यातील छोटा शेख दर्गा तर पुण्येश्वराच्या जागी उभा आहे. पुण्येश्वराचे मंदिर एक एकर जागेत होते. नागेश्वराचे मंदिरदेखील भव्य होते. नारायणेश्वर मंदिर नदीपात्रातून पाहिल्यास त्याची भव्यता दिसते. मात्र हे सर्व नष्ट करून आधी दर्गे आणि नंतर त्याठिकाणी मशिदी उभारल्याचा आरोप मनसेने केला होता.