पुणे | 2 सप्टेंबर 2023 : विद्यार्थ्यांच्या जीवनात पदवी हा महत्वाचा विषय असतो. अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ म्हणजे पदवी असते. त्या पदवीच्या आधारेच त्यांचे भवितव्य ठरत असते. यामुळे रात्रंदिवस मेहनत करुन विद्यार्थी पदवी परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांना पदवी देण्याचे काम विद्यापीठांकडून दिले जाते. देशभरातील सर्व विद्यापीठे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अख्यत्यारित कामे करतात. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने या पदवी प्रमाणपत्रासंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. यामुळे प्रत्येकाच्या पदवी प्रमाणपत्रावर हा बदल येणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रसिद्ध झालेल्या बातम्याच्या आधारे हा आदेश दिला आहे. काही विद्यापीठे आणि राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर आधार क्रमांक प्रसिद्ध केला जात आहे. परंतु हा आधार क्रमांक प्रसिद्ध करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रतिबंध केला आहे. आधार क्रमांक सार्वजनिक करता येणार नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना महाविद्यालये त्यांच्याकडून आधार क्रमांकही घेतात. हा आधार क्रमांक काही प्रमाणपत्रांवर प्रसिद्ध केले जात असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशास आले. यामुळे तात्पुरती दिली जाणारी प्रमाणपत्रे आणि पदवी प्रमाणपत्रावर आधार क्रमांक छपण्यास युजीसीकडून प्रतिबंध करण्यात आले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या नियमांचे पालन करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोग ही केंद्र सरकारने स्थापन केलेली सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था सर्व विद्यापीठांचे नियंत्रण करण्याचे काम करते. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. तसेच पुणे, भोपाळ, कोलकाता, हैदराबाद, गुवाहाटी आणि बंगलोर येथे सहा प्रादेशिक केंद्रे आहेत. पुणे येथे विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपकेंद्र आहे, तसेच देशातील नामांकीत विद्यापीठांच्या यादीत असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी येतात.