नगर: आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली आहे. अण्णा आणि पवारांना बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यात अपयश आल्याने या दोघांच्याही वर्चस्वासाठी हा धक्का असल्याचं मानलं जात आहे. (unopposed election break at ralegan siddhi and hiwarebazar)
पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार गाव आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यामुळे अवघ्या 7 सदस्यांच्या या ग्रामपंचायतीची प्रत्येकवेळी बिनविरोध निवडणूक होत होती. पोपटराव पवार सांगतील तसे गावकरी वागत होते. मात्र, यंदा ही परंपरा प्रथमच खंडित झाली असून सातही जागांसाठी निवडणूक होणार आहे.
30 वर्षानंतर हिवरे बाजारमध्ये निवडणूक
हिवरे बाजारमध्ये 1985 मध्ये निवडणूक झाली होती. त्यानंतर 1989 पासून सलग सहावेळा बिनविरोध निवडणूक झाली आहे. त्यामुळे आता 30 वर्षानंतर हिवरे बाजारमध्ये निवडणुका होत असून पवार यांच्या विरोधात परिवर्तन ग्रामविकास पॅनल मैदानात उतरले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पोलीस संरक्षणाची मागणी
तब्बल 30 वर्षानंतर निवडणूक होत असल्याने आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून दहशत निर्माण केली जात असल्याने प्रचारा दरम्यान पोलीस संरक्षण देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.
अण्णा आणि लंकेंना अपयश
राळेगणसिद्धीमध्ये यंदाही बिनविरोध निवडणूक होणार नाही. राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आमदार निलेश लंके यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. त्यांच्या या मोहिमेला यशही आले होते. गावकऱ्यांची बैठक घेऊन बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी माशी शिंकली असून अण्णा आणि लंके यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. त्यामुळे राळेगणमध्ये निवडणूक होणार आहे.
फक्त दोन जागा बिनविरोध
राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या 9 आहे. पण या 9 पैकी फक्त दोनच जागा बिनविरोध करण्यात अण्णा हजारे यांना यश आले आहे. उरलेल्या सात जागांवर निवडणुका होणार आहेत. पाच वर्षापूर्वी राळेगणसिद्धीत ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. त्याआधी अपवाद वगळता एखाद-दोन वेळा निवडणुका झाल्या. काही वेळा बिनविरोध निवडणुकाही झाल्या. पण ही परंपरा कायम राखण्यात अण्णांना सपशेल अपयश आले आहे. (unopposed election break at ralegan siddhi and hiwarebazar)
25 लाखांची जादू चालली नाही
आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा विकास निधी देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या अभियानाला उत्तम प्रतिसादही मिळाला. त्यामुळे पारनेर तालुक्यातील 110 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोधही झाल्या. तसेच लंके यांच्या प्रयत्नाने 776 पैकी 210 सदस्य बिनविरोध निवडूनही आले. पण त्यांच्या 25 लाखांची जादू राळेगणमध्ये काही चालली नसल्याचं दिसून येतं.
नवी पिढी, नवं राजकारण
हिवरे बाजार आणि राळेगणसिद्धीमध्ये बिनविरोध निवडणूक न होण्यामागे राजकीय साचलेपण हे एक कारण असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. त्याच त्याच लोकांना प्रत्येक वेळेस बिनविरोध निवडून आणलं जायचं. त्यामुळे गावातील इतर सदस्यांना गावच्या राजकीय प्रक्रियेत भाग घेण्याची संधीच मिळत नव्हती. त्यामुळे तरुणांनी हा नेहमीचा साचलेपणा झुगारून लावून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळेच राळेगण आणि हिवरे बाजारमध्ये निवडणूक होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (unopposed election break at ralegan siddhi and hiwarebazar)
VIDEO | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 4 January 2021https://t.co/FHd6fnYiDd#Mahafast #LatestNews #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2021
संबंधित बातम्या:
एकदा तपास पूर्ण होऊ द्या, मग पाहूच; संजय राऊतांचा रोखठोक इशारा
70 वर्षांच्या आजी थेट निवडणुकीच्या रिंगणात, गाव पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार
ग्रामपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली; आता प्रचाराचं धुमशान!
(unopposed election break at ralegan siddhi and hiwarebazar)