पुणे | 22 ऑक्टोंबर 2023 : राज्यातून परतीचा मॉन्सून जाऊन आठ ते दहा दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यानंतर देशभरातून मॉन्सून परतल्याची घोषणा हवामान विभागाने केली. परंतु आता पुणे जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. लोणावळा शहरासह ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. आता इंद्रायणी भात कापणीला आला आहे. मात्र यावेळी सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेती संकटात आली आहे. अवकाळी मुसळधार पावसामुळे मावळातील बळीराजा चिंतेत आला आहे. एकविरा देवीच्या मंदिर भागात देखील जोरदार पाऊस झाल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची धावपळ उडाली.
पुण्यातील भाजी मार्केट २५ ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. शेतकऱ्यांनी बाजार समितीत २५ तारखेला माल घेऊन येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील भाजी मार्केट बंद असतो. यामुळे २५ ऑक्टोबर रोजी बाजार समिती बंद राहणार आहे. फुलांचा बाजार फळांचा बाजार बंद राहणार आहे. तसेच मोशीचा उपबाजार ही बंद राहणार आहे.
मावळ तालुक्यात बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकजण जखमी झाले आहेत. जुन्नर, शिरूर, खेड, आंबेगावमध्ये बिबट्यांकडून हल्ले होत आहे. नुकतेच मावळमधील शेतकरी एकनाथ शिंदे यांच्या गाडीच्या पुढे लोणावळ्यातून पवनानगरकडे जाताना बिबट्या आला.
पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांची बदली करण्यात आली होती. महापालिकेचा चार्ज घेतल्यापासून ५ महिन्यांच्या आतच मुंबईला अंधत्व नियंत्रण कार्यक्रम संचालक पदावर त्यांची बदली झाली. त्यांनी या बंदीला मॅटमध्ये आव्हान दिले. यावेळी मॅटने त्यांच्या बाजूने निर्णय देते आधीच्या पदावर रुजू होण्याचे आदेश दिले. यामुळे पुणे मनापाच्या आरोग्य प्रमुखपदी पुन्हा डॉ भगवान पवार आले आहेत.
लोणावळ्यातील कार्ला गडावर नवरात्रीच्या काळात राज्यातील अनेक भाविक एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येतात. यावेळी नवरात्रानिमित्त भाविकांची चांगली गर्दी झाली आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी कार्ला मंदिर प्रशासकीय संस्थाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. नवी मुंबई तसेच माटुंगा, कोळीवाडा आणि कार्ला येथील कोळी समाज गडावर देखरेख करत आहे. अष्टमीच्या होम हवनसाठी कार्ला गड एकविरा मंदिर 24 तास खुलं राहणार आहे.