Rain | राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट

| Updated on: Nov 08, 2023 | 9:31 AM

unseasonal rain : राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी न गाठता निरोप घेतला. कमी मॉन्सून झाल्याचा फटका यंदा बसणार आहे. परंतु आता अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आला आहे. राज्यातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाला असून कोकणालाही या पावसाचा फटका बसला आहे.

Rain | राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट
Follow us on

कोल्हापूर, सांगली, सातारा | 8 नोव्हेंबर 2023 : हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भात आणि द्राक्षाला या अवकाळीचा फटका बसणार आहे. परंतु रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पलूस तालुक्यात अंकलखोप या गावी रात्री वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांचे पीक शेतात

मंगळवारी रात्री वातावरणात बदल होऊन अचानक पाऊस सुरु झाला. या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्येच अडकला आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागायतदारांना सुद्धा या पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. बुधवारी सांगली जिल्ह्यातील वातावरण ढगाळ आहे. जिल्हयात पुन्हा पाऊसाची शक्यता आहे. या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस भागात पहाटेपासून अवकाळी पाऊस तर जत तालुक्यातील उमदी भागात देखील पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांसह अन्य पिकांवर रोगाचा धोका आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार

कोल्हापूरच्या राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात बुधवारी पहाटे जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांनी मळणीसाठी भात पिक शेतात ठेवला होता. त्याचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

रत्नागिरीत अवकाळीचा फटका

रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यरात्री अवकाळी पाऊस झाला. दक्षिण रत्नागिरीत मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळला. रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि संगमेश्वरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. बुधावारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने बुधवारी पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात भात कापणी राहिलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पोटात गोळा उठला आहे.

कराड, पाटणला पाऊस

सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. कराड, पाटण तालुक्यात रात्री अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यात पाणी शिरले. शेतकऱ्यांच्या पिकांनाही या पावसाचा फटका बसला. परंतु रब्बी हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.