पुणे | 11 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातून थेट वंदे भारत एक्स्प्रेस अजून सुरु झालेली नाही. मुंबईवरुन सोलापूरला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यावरुन जात आहे. या गाडीला चांगला प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत आहे. सोलापूर, मुंबई वंदे भारतची लोकप्रियता वाढली आहे. लाखो प्रवाशांची वंदे भारतने प्रवास सुरु केला आहे. गेल्या 25 दिवसांत सोलापूर, मुंबई या वंदे भारत ट्रेनमधून 24 हजार 894 जणांनी प्रवास केला. त्यामुळे रेल्वेची कमाई 2 कोटींच्यावर गेली आहे. पुणेकर वंदे भारत एक्स्प्रेसला पसंती देत असल्याचे या आकडेवारीतून दिसत आहे.
पुणे शहरात गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे. पुणे शहरात आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात झाली आहे. शहरात आतापर्यंत एकूण 94 हजार जणांना आनंदाचा शिधाचे वाटप केले जात आहे. गणेशोत्सव आणि दिवाळीनिमित्त पुणे शहरातील 3 लाख 20 हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. येत्या 19 सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के शिधा वाटप पूर्ण होणार आहे. रवा, पाम तेल, साखर ,चणाडाळ अशा चार खाद्यपदार्थांचा आनंदाचा शिधामध्ये समावेश आहे.
पुणे महानगरपालिकेच्या शाळांचे तातडीने फायर ऑडिट करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून पुणे मनपाच्या आयुक्तांकडे करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट, आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची शिवसेनेची मागणी आहे. महानगरपालिकेच्या शाळेत आगीच्या घटना घडत असल्याने ठाकरे गटाने आयुक्तांकडे फायर ऑडीटची मागणी केली आहे.
खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे. आता 15 ऑक्टोबरपर्यंत ॲपद्वारे खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करता येणार आहे. पुणे जिल्ह्यातील 25 हजार शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंदणी केली आहे. पुणे जिल्ह्याभरातून 24000 हेक्टरच्या क्षेत्रफळांची नोंद करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक पाहण्याची नोंदणी करावी लागते.
पुणे जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्यात येणार आहे. वनराई बंधारे बांधण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून मोहीम आखली जाणार आहे. जिल्हाभरात सुमारे 10 हजार वनराई बंधारे जिल्हा परिषद बांधणार आहे. श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची मोहीम घेण्यात येणार आहे. वनराई बंधारा मोहिमेमुळे जिल्हाभरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.