पुणे रेल्वे स्टेशनवरुन अजूनपर्यंत एकही वंदे भारत एक्स्प्रेस थेट धावत नाही. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस पुणे स्टेशनवरुन जाते. परंतु पुणे स्टेशनवरुन थेट सुटणारी एकही ट्रेन नाही. त्यामुळे सोमवार 16 सप्टेंबरपासून हुबळी-पुणे ‘वंदे भारत’ धावणार होती. ही ‘वंदे भारत’ ट्रेन आठवड्यातून तीन दिवस हुबळी- मिरज- कोल्हापूर- मिरज- पुणे आणि पुणे-मिरज-कोल्हापूर-मिरज-हुबळी अशी धावणार होती. परंतु ती आता स्थगित करण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांना वंदे भारत एक्स्प्रेससाठी पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पुणे ते हुबळी या दोन शहरांना जोडणारी नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन 16 सप्टेंबर रोजी होणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जमशेदपूर येथून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार होते. परंतु तिची 16 सप्टेंबर रोजी होणारी ट्रायल रन पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती पुणे विभागातील रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राम पॉल बारपाग्गा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. आता ट्रायल रन 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यामुळे वंदे भारत कधी सुरु होईल, त्याची तारीख अद्याप ठरलेले नाही. महाराष्ट्रातून सध्या सहा वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. मुंबई ते शिर्डी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते मडगाव (गोवा), मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदूर वंदे भारत सुरु आहे.
राम पॉल बारपग्गा म्हणाले की, वंदे भारत एक्सप्रेस पुणे-हुबळी मार्गावर धावणार आहे. या ट्रेनमुळे पुणेकर प्रवाशांना हुबळीला जाण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. ही ट्रेन हुबळी येथून पहाटे 5:00 वाजता निघणार आहे. दुपारी 1:30 वाजता पुण्यात पोहचणार आहे. त्यानंतर पुण्याहून दुपारी 2:30 वाजता हुबळीसाठी ही ट्रेन सुटेल. रात्री 10:00 वाजता हुबळीला पोहोचणार आहे. 17 तासांत हा राऊंड प्रवास वंदे भारत पूर्ण करणार आहे. पुणे-हुबळी अंतर 558 किमी अंतर आहे.