अभिजित पोते, पुणे | 7 ऑक्टोंबर 2023 : सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत आपले खासदार निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चाबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन आघाड्यांच्या गणित तयार केले जात आहे. तसेच काही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. सध्या राज ठाकरे यांच्या मनसेच्या लोकसभेच्या उमेदवारांची संभाव्य यादीही व्हायरल होत आहे. त्याच वेळी पुणे लोकसभेसाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी तयारी सुरु केली आहे.
सध्या पुणे लोकसभेसाठी अनेक पक्षांनी तयारी सुरु केली आहे. त्यात मनसेकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. खासदारकीच्या शर्यतीत मनसेचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक वसंत मोरे उतरले आहेत. येत्या १० ऑक्टोंबर रोजी वसंत मोरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पुणे शहरांत त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. त्या बॅनरवर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संधी मिळणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांनी सांगितले की, गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा लढवण्याची इच्छा मी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. त्या दिवसांपासून माझी तयारी सुरु झाली आहे. माझा पंधरा वर्षांचा सामाजिक कामाचा अनुभव आहे. मी नगरसेवक आणि मनसेच्या माध्यमातून शहराचे काम पाहिले आहे. जनतेचे प्रश्न सोडवले आहे.
यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व नियोजन केल्यास आम्हाला शंभर टक्के यश मिळेल. कारण सध्याचे राजकारण धरसोडीचे झाले आहे. परंतु मनसेचे जनतेत अस्तित्व आहे. हे अस्तित्व जपण्यासाठी मी काम करत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता मनसेच्या सोबत राहिल आणि आमचा विजय निश्चित असणार आहे. पुणे लोकसभेसाठी मला उमेदवारी दिली तर नक्कीच आम्ही पुणेकरांचे प्रश्न सोडवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.