मर्दानी पोवाडा गाणारी तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं निधन

| Updated on: May 25, 2021 | 6:35 PM

मर्दानी पोवाडा गाणारी तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं आज कोरोनाने निधन झालं. (Veteran Tamasha Artist kantabai satarkar passed away)

मर्दानी पोवाडा गाणारी तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं निधन
kantabai satarkar
Follow us on

नगर: आपल्या अदाकारीने तमाशा जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ वगसम्राज्ञी, मर्दानी पोवाडा गाणारी तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं आज कोरोनाने निधन झालं. त्या 82 वर्षाच्या होत्या. त्या प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत्या. कांताबाई सातारकर यांच्या निधनाने तमाशातील एका युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे. (Veteran Tamasha Artist kantabai satarkar passed away)

कांताबाई सातारकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर संगमनेर येथे गेल्या काही दिवसांपासून उपचारही सुरू होते. मात्र, वयोमानामुळे त्यांची प्रकृती दिवसे न् दिवस खालावत होती. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आजच अंतिमसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं.

गुजरातमध्ये जन्म

1939मध्ये कांताबाईंचा जन्म झाला होता. गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्यापोटी कांताबाईंचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात तमाशा नव्हता. तसेच तमाशाशी कुणाचा संबंधही नव्हता. त्यांचे वडील गुजरातमधून मूळगावी साताऱ्याला आले. तेव्हा कांताबाई बालपणी मैत्रीणींसोबत नृत्य करायच्या. साताऱ्यातील विविध मेळ्यातील नृत्याची त्या नक्कल करायच्या. त्यातूनच त्यांचा नृत्य आणि तमाशाकडे कल वाढला. पुढे साताऱ्यातील सर्जेराव अहिरवाडीकर यांच्या तमाशात त्यांनी काम सुरू केलं. बघता बघता कांताबाई सातारकर हे नाव गाजू लागलं.

खेडकरांशी आयुष्याची जोडी जमली

कांताबाईंनी पुण्या-मुंबईतही तमाशाचे खेळ केले. त्यानंतर त्यांनी पुढे हनुमान थिटएटरमधील तुकाराम खेडकरांच्या तमाशात काम सुरू केलं. खेडकराच्या तमाशाचा बाज आवडल्याने त्यांनी खेडकरांच्या तमाशात काम करण्याचा निर्णय घेतला. कांताबाई आणि खेडकर या जोडीने रायगडाची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय, गवळ्याची रंभा आदी धार्मिक, सामाजिक वगनाट्यात काम केलं. तमाशात गाजलेली ही जोडी पुढे आयुष्यताही एक झाली. त्यांनी तुकाराम खेडकर यांच्याशी विवाह केला. पुढे त्यांना अनिता, अलका, रघुवीर व मंदाराणी अशी चार अपत्ये झाली. मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थियेटरला जायचा.

पतीच्या निधनानंतर एकाकी पडल्या

1964 मध्ये त्यांच्यावर मोठा आघात झाला. येवला तालुक्यातील एका गावात तमाशा सुरू असताना अचानक तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली. त्यामुळे उपचारासाठी पुण्याला नेत असताना खेडकरांचे निधन झाले. पती गेल्यानंतर त्या एकट्या पडल्या. त्यांचं नशीब फिरलं. एवढेच नव्हे तर त्यांना पतीच्याच तमाशातून बाहेर पडावे लागले होते.

जीवन गौरवने सन्मानित

दोन वर्षापूर्वी त्यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली होती. त्याबद्दल आणि तब्बल 70 वर्षे तमाशा कला क्षेत्रात मोठं योगदान दिल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. संगमनेरमधील मालपाणी लॉन्सवर एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक बडे नेते उपस्थित होते.

पुरस्कार

तमाशा क्षेत्रातील योगदान पाहून राज्य सरकारने 2005 मध्ये त्यांना पहिला ‘विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरवलं होतं. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आवारात तंबू टाकून सिने, नाट्यसृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमानही त्यांना मिळाला आहे.

गाजलेली वगनाट्य

रायगडची राणी
गवळ्याची रंभा
गोविंदा गोपाळा
1857 चा दरोडा
तडा गेलेला घडा
अधुरे माझे स्वप्न राहिले
कलंकिता मी धन्य झाले
असे पुढारी आमचे वैरी
डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी
कोंढाण्यावर स्वारी
पाच तोफांची सलामी
महारथी कर्ण
हरिश्चंद्र तारामती
जय विजय (Veteran Tamasha Artist kantabai satarkar passed away)

 

संबंधित बातम्या:

Home Isolation ban : फ्लॅट, बंगल्यात राहणारे लोक कोव्हिड सेंटरला कसे येतील? पुण्याच्या महापौरांचा प्रश्न

Arrest Yuvika Choudhary | अटकेच्या भीतीने घाबरली युविका चौधरी, सोशल मीडियावर पोस्ट लिहित मागितली माफी!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर पुण्यातील घरी चाकूहल्ला

(Veteran Tamasha Artist kantabai satarkar passed away)