अहमदनगर | 20 ऑक्टोंबर 2023 : गाव करी ते राव न करी, असे आपल्याकडे नेहमीच म्हटले जाते असते. राजकीय पुढाऱ्यांकडून सर्वच गोष्टीसंदर्भात आश्वासने दिले जातात. परंतु ही आश्वासने पूर्ण होत नाही. यामुळे अनेक जणांची निराशा होत असते. परंतु राजकीय नेत्यांकडून देण्यात येणाऱ्या आश्वासनामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एका गावाने मोठा निर्णय घेतला आहे. या गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावात गावात आजी-माजी आमदार, राजकीय पुढारी यांना प्रवेश नाही, असे बॅनर्स लावण्यात आले आहे. त्या बॅनर्सची चर्चा राज्यात सर्वत्र होऊ लागली आहे.
मराठा आरक्षणामुळे गावाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत सर्वच पक्षांची सरकार सत्तेत आली. परंतु एकाही पक्षाच्या सरकारकडून मराठा समाजास न्याय दिला गेला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या घोषणा सर्वच राजकीय पक्षांनी केल्या. परंतु या घोषणा आणि आश्वासनाची पूर्ती एकाही राजकीय पक्षाकडून झाली नाही. यामुळे मराठा समाजास आरक्षणासाठी पुन्हा आंदोलने उभारावे लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावाने राजकीय पुढाऱ्यांना बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील मिरी गावाने वेगळा निर्णय घेतला आहे. या गावाने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गाव बंदी असणार आहे. आजी माजी आमदार, राजकीय पुढारी यांना गावात प्रवेश नाही, असे बॅनर लावण्यात आले आहे.
मराठा समाजास सरसकट ओबीसीतून ५० टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची मागणी गावाने केली आहे. यासंदर्भात बॅनर्स लावले असून त्यावर आपले नम्र म्हणून समस्त मराठा बांधव मिरी असे लिहिले आहे. या बॅनर्सची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.