पुणे: राज्याच्या ग्रामीण भागातील समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या यात्रा आणि जत्रा (Jatra) पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, पुणे जिल्ह्यात प्रशासनाने लहान यात्रा आणि जत्रांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Yatra and Jatra will start in Pune region)
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गावांचे प्रस्ताव येतील तसे छोट्या यात्रांना परवानगी दिली जाणार आहे. स्थानिक महानगरपालिका आणि प्रशासनाने तशी परवानगी द्यावी, अशा सूचना सौरभव राव यांनी दिल्या आहेत.
मोठ्याप्रमाणावर गर्दी होणाऱ्या जत्रा आणि यात्रांसाठी विभागीय कार्यालयाची परवानगी आवश्यक असेल. सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच विभागीय कार्यालय यासंदर्भात निर्णय घेईल. मात्र, छोट्या यात्रा व जत्रांना तशा परवानगीची गरज नाही, असे विभागीय कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली होती. त्यामुळे अनेक गावांमधील जत्रा व यात्रा रद्द कराव्या लागल्या होत्या. या उत्सवांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी उलाढाल होते. जत्रांच्या काळात ग्रामीण भागांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. मात्र, कोरोनामुळे वर्षभर हे सर्व ठप्प होते. मात्र, आता पुणे जिल्ह्यापुरता का होईना ग्रामीण जीवनातील हा उत्साह पुन्हा परतणार आहे.
कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली होती.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. त्याचबरोबर कोरोनाची नियमावली पाळून आंगणेवाडीच्या यात्रेत फक्त धार्मिक विधी केले जातील, असं देखील त्यांनी सांगितले.
यात्रेकरूनी यावर्षी दर्शनासाठी येऊ नये. यावर्षी आंगणेवाडीची जत्रा साध्या पद्धतीने साजरा केली जाणार आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात तारीख जाहीर केली होती. तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा होता. तेव्हाच आम्ही यात्रा आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादीत ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
संबंधित बातम्या:
कोरोना संसर्गाने तमाशाही अडचणीत, सुपाऱ्या रद्द झाल्यानं कोट्यावधींचा फटका
(Yatra and Jatra will start in Pune region)