कुणाल जयकर, अहमदनगर | 5 नोव्हेंबर 2023 : राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मतदान करण्यासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत. गावपातळीवरील निवडणूक असल्यामुळे मतदारांचा चांगला उत्साह दिसून येत आहे. प्रत्येक मत महत्वाचे आहे. यामुळे सर्वच मतदारांना आणण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. ग्रामीण भागात शेतात जाण्यापूर्वी अनेक जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा होत्या. दुपारी काही ठिकाणी रांगा कमी झाल्या. अहमदनगर जिल्ह्यातील करंजी ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु आहे. या ठिकाणी मतदान केंद्रावर एक दुर्देवी घटना घडली. मतदानासाठी आलेल्या मतदारास ह्रदयविकाराचा झटका आला. यामुळे मतदान केंद्रावर गंभीर वातावरण निर्माण झाले.
अहमदनगर जिल्ह्यातील 1 हजार 697 सदस्यपदासाठी मतदान होत आहे. 175 ठिकाणी सरपंचपदाची थेट निवडणूक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पार्थर्डी तालक्यातील करंजी ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी सातवाजेपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी सुनिल गांधी हे मतदानासाठी आले होते. मतदान करुन ते मतदान कक्षाच्या बाहेर आले. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे मतदान केंद्रावर धावपळ उडाली. त्यांना तातडीने रुग्णालायत नेण्यात आले.
सुनील गांधी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. परंतु गावातील मतदान असल्यामुळे ते मतदानासाठी आले. मतदान करेपर्यंत त्यांना काहीच त्रास झाला नाही. मतदान करुन आल्यानंतर त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. परंतु उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली. पाथर्डी करंजी ग्रामपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी महत्वाची आहे. निवडणुकीचा निकाल सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यात कोणता गट बाजी मारणार? हे स्पष्ट होईल.