कुठे भानामती, कुठे राडा, तर कुठे पैसे वाटप, ग्रामपंचायत निवडणुकीत कुठे काय काय घडलं?

| Updated on: Nov 05, 2023 | 2:32 PM

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठा राडा झाला होता. या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात 158 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू आहे. या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास दीड हजार पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. अफवा पसरणाऱ्यांवर पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कुठे भानामती, कुठे राडा, तर कुठे पैसे वाटप, ग्रामपंचायत निवडणुकीत कुठे काय काय घडलं?
Maharashtra Panchayat Election
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे | 5 नोव्हेंबर 2023 : राज्यातील 2359 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. गावगाड्यावर आपलंच वर्चस्व राहावं म्हणून राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी मतदान सुरू आहे. काही ठिकाणी मतदान शांततेत पार पडत आहे. तर काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागलं आहे. कुठे राडा झालाय. कुठे भानामतीचा प्रकार उघड झालाय तर कुठे बाचाबाची करण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी ऐंशीतील ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानात भाग घेतला आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील संवेदनशील असलेल्या नांद्रे या गावी मतदारांना पैसे वाटप करण्यात आले आहेत. अभिजीत सकळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल केली आहे. सकळे यांच्या तक्रारीवरून संदीप पाटील याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करमअयात आला आहे. संदीप पाटील यांनीही चपाते प्लॉटवर मतदारांना का भेटतोस असे म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार अभिजित सकळे यांच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दोघांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हा दाखल केल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली आहे. ही घटना काल रात्री घडली असून याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोल्हापुरात भानामती

कोल्हापूरमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच भयानक प्रकार दिसून आला. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवेत भानामतीचा प्रकार आढळून आला आहे. उमेदवारांचे फोटो, लिंबू आणि बाहुली असं साहित्य मतदान केंद्राबाहेर टाकण्यात आलं होतं. मतदानाच्या काही तास आधीच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कसबा वाळवे ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे.

दिव्यांग आजीचे आमदार बेनके बनले सारथी

पुण्यातील जुन्नरमधील नारायणगाव ग्रामपंचायत निवडणूक मतदान पार पडत असताना दिव्यांग वृद्ध आजीला आमदारांनी आधार देत झोळीत टाकलं. त्यानंतर तिला मतदान खोलीत आणलं. दिव्यांग आजी मतदानासाठी नारायणगाव येथील खैरमळा येथे मतदान केंद्रावर आली. मात्र दिव्यांग असल्याने आजीला थेट आधार देण्यासाठी जुन्नरचे आमदार अतुल बेनके झोळीचे सारथी बनले. त्यांच्या या मदतीचं कौतुक होत आहे.

उमेदवार भिडले

कोल्हापूरच्या चिंचवड मतदान केंद्रावर दोन गटाचे उमेदवार आणि मतदान प्रतिनिधी एकमेकांना भिडले. मतदान केंद्रातच हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाद मिटवला. तसेच भांडणाऱ्या उमेदवार आणि मतदान प्रतिनिधींना मतदार केंद्रातून बाहेर हाकललं. मतदारांना मतदान करण्यासाठी सांगण्यात आल्याच्या वादातून ही बाचाबाची झाली.

बारामतीत पैसे वाटप

बारामतीच्या काटेवाडीत मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावात रात्री अडीचशे रुपये देऊन मते विकत घेण्यता आल्याचा आरोप भाजपचे पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी केला आहे. 40 हजार लोकांना पैशांचं वाटप करण्यात आलं आहे. विकास कामात खाल्लेले हे पैसे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच बारामतीत सुविधांचा अभाव असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

रात्री जीवघेणा हल्ला

नाशिकमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधीच मोठा राडा झाला. काल रात्री उमदेवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. इगतपुरीतील धारगाव येथे हा प्रकार घडला. रंजन गोर्धने हे रस्त्यात उभे असताना रात्री 8 च्या सुमारास हा हल्ला झाला आहे. एका टोळक्याने अचानक हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.

अमरावतीत तुफान हाणामारी

अमरावतीत चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथील मतदान केंद्रावर दोन गटात तुफान दगडफेक झाली. दोन गटात बाचाबाची झाल्यानंतर ही दगडफेक झाली. मतदान केंद्रात उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून कोण राहणार या मुद्द्यावरून ही बाचाबाची झाल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, पोलिसांनी या दोन्ही गटाला मतदान केंद्रावरून हाकलून दिलं आहे. त्यांना मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. यावेळी मतदान केंद्राबाहेर तुफान गर्दी झाली होती.

चिठ्ठी चिन्हाचं नाव म्हणून…

धुळे जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान सुरू आहे. शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याने काही काळ या ठिकाणी मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटातील वाद मिटवला आणि नंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. या ठिकाणी एका चिठ्ठीवर उमेदवाराने निवडणूक चिन्ह नमूद केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर दोन गटांमध्ये राडा झाला. मात्र पोलिसांनी दोन्ही गटातील वाद सामंजस्याने मिटवला.

सव्वा तास ईव्हीएम बंद

पालघर तालुक्यातील जल्सार ग्रामपंचायत येथील मतदान केंद्रावर एक तास ते सव्वा तास ईव्हीएम मशीन बंद होतं. सकाळी मतदान सुरू झाल्यावर हा प्रकार घडला. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढली. दुसरी मशीन येईपर्यंत या मतदारांना मतदान केंद्रावर सव्वा तास ताटकळत बसावं लागलं आहे.

आजारी तरीही…

पालघरमधील शिरगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत एका 80 वर्षीय आजारी महिलेने मतदानाचा हक्क बजावला. ही महिला गेल्या काही दिवसांपासून आजारपणाने बेजार आहे. तशाही अवस्थेत तिने वॉकरच्या सहाय्याने मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावला.

कार रस्त्यात बिघडली अन्…

जळगाव जिल्ह्यात तहसीलदारांना पायपीट करावी लागली. मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी तहसीलदार येत होते. पण त्यांची कार रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे काही अंतर पायी चालत तर काही अंतरावरून मिळेल त्या वाहनाने तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी पाळधी मतदान केंद्र गाठले. विशेष म्हणजे या कारमध्ये मतदानासाठीच्या मशीनही होत्या. त्या सर्व त्यांना पायपीट करत मतदान केंद्रावर आणाव्या लागल्या. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 13 वर्षापासून ही कार खराब आहे. तरीही ही कार बदलली नाही.