रणजित जाधव, मावळ, पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : राज्यातील विविध शाळांमध्ये अनेक उपक्रम राबवले जात असतात. हे उपक्रम राबवण्यात सरकारी शाळाही मागे नाहीत. यामुळे गावा-गावांमध्ये असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांची चर्चा होत असते. सोलापूरचे डिसले गुरुजी म्हणजेच रणजीतसिंह डिसले जगातील 10 शिक्षकांच्या यादीत आले. त्यांच्या शाळेची आणि त्यांच्या शैक्षणिक पॅटर्नची चर्चा केवळ राज्यभर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. पुणे जिल्ह्यातील शाळेच्या एका वेगळ्याच उपक्रमाची चर्चा आता होऊ लागली आहे. या शाळेने ‘वॉटर बेल’ हा उपक्रम सुरु केला आहे.
सध्या ऑक्टोबर महिना झाला आहे. यामुळे ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवत आहे. तापमान ३५ ते ४० अंशा दरम्यान गेले आहे. वाढत्या तापमानाचा शरीरावर परिणाम होत असतो. यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळमधील आणि तालुक्यातील शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पावसाळ्यातील वातावरणानंतर अचानक उष्णता वाढली आहे. यामुळे उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मावळतील शाळेत ‘वॉटर बेल’ हा उपक्रम सुरू करण्यात आला.
ज्या प्रमाणे शाळेत लन्च ब्रेक असतो, त्यासाठी शाळांची घंटा वाजते, तसेच शाळेत ‘वॉटर बेल’ सुरु केली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी विशेष सुट्टी दिली जाणार आहे. त्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पाणी पिण्याकडे शिक्षक लक्ष ठेवणार आहे. विद्यार्थ्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण सुयोग्य राखण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी शाळेने आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे.
विद्यार्थी गडबडीत पाणी पीत नाही. पाणी पिण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन डिहायड्रेशन होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम पाणी करते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. मुतखडासारखे आजार होत नाही. पाणी शरीरासाठी सर्वात महत्वाचा घटक असल्याने त्याची कमतरता होऊ नये म्हणून शाळेत वॉटर बेल सुरु केली आहे. शाळेच्या या उपक्रमाची चर्चा होत आहे.