पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : राज्यात यंदा कमी पाऊस झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. कमी पावसाचा परिणाम आता पुढील आठ महिने जाणवणार आहे. पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर कमी पावसाचा परिणाम होणार आहे. यंदा पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे. परंतु हे पाणी आता पुढील आठ महिने पुरवावे लागणार आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार पाणी मिळाले नाही.
पुणेकरांना वर्षाला 20.90 टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली होती. परंतु मनपाची ही मागणी मान्य करण्यात आली नाही. खडकवासला आणि भामा आसखेड धरण प्रकल्पातून केवळ पुणेकरांसाठी 12.82 टीएमसी पाणीसाठा मिळणार आहे. सन 2023-24 या वर्षासाठी पाटबंधारे विभागाकडून हा पाणीसाठा मंजूर करण्यात आला. यामुळे आता मनपाला कमी पाण्यात वर्षभराचे नियोजन करावे लागणार आहे.
पाटबंधारे विभागाने पुणे मनपास कमी पाणी मंजूर केले आहे. यामुळे आता मनपाला पुणे शहरातील पाण्यात कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. पुणे मनपाने 12.82 टीएमसीपेक्षा जास्त पाणी वापरल्यास महापालिकेला तीन पट दंडाचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. पाटबंधारे विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. यामुळे पुणे शहरातील नागरिकांना जपूनच पाणी पुढील आठ महिने वापरावे लागणार आहे.
गेल्या सहा वर्षांत सर्वात कमी पाणी यंदा मनपाला मिळाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मनपाची पाणी गळती सुमारे 35 टक्के आहे. यामुळे यंदा पुणेकरांना कमी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. गेल्या सहा वर्षांत इतके कमी पाणी पुणे मनपाला कधीच मिळाले नाही. यामुळे मनपाची पाणीपुरठा करताना कसरत होणार आहे.