अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 21 जानेवारी 2023 : मुख्यमंत्री आमचं ऐकत नाही, राज्याचं ऐकत नाहीत, महाराष्ट्राचा ऐकत नाहीत, ते फक्त गुजरातचं ऐकतात. हे सरकार पडणार म्हणजे पडणार आणि आपलं सरकार नक्की बसणार. ज्या अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला गुजरातच्या आदेशावरून लुटलं त्या सर्वांना जेलमध्ये टाकू, असा इशाराच माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. या लोकांनी राज्याचं राजकारण यांनी गढूळ केलं आहे. राष्ट्रवादीसोबत जायची वेळ आली तर संन्यास घेऊ म्हणणारे लोकं आज राष्ट्रवादीसोबत बसले आहेत. संन्यास घेणार होते त्याचं काय झालं? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज पुण्यात होते. यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अवकाळी पावसासारखं अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलं आहे. पुण्यात येणारी वेदांता कंपनी या सरकारने घालवली. ही कंपनी पुण्यात राहावी म्हणून आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. ही कंपनी राज्यात राहिली असती तर मोठा रोजगार आपल्याला मिळाला असता. पण सरकार बदलून खोके सरकार आलं आणि ही कंपनी गुजरातला गेली. या सरकारने त्या कंपनीला गुजरातला जायला भाग पाडलं. नागपूरमध्ये येणारी एअर बस कंपनी गुजरातमध्ये पाठवली. संभाजी नगरमध्ये येणारा उद्योग गुजरातला पाठवला. एकूण 5 कंपन्यासह फिल्म फेअर अवोर्ड देखील गुजरातला नेला, असा हल्लाच आदित्य ठाकरे यांनी चढवला.
गुजरातला वर्ल्ड कप नेला आणि आपण हरलो. जर तुम्ही वानखेडेवर अंतिम सामना खेळवला असता तर आपण जिंकलो असतो. मागच्या वर्षी 2 दिवसात दावोसमध्ये 40 कोटी रुपये खर्च झाले. आता 50 लोक घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांना 50 हा आकडा खूपच आवडतो, असा टोला लगावतानाच दावोसमध्ये जाऊन त्यांनी मज्जा केली. तुम्ही राज्यासाठी काय आणलं ते सांगा, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिलं.
पुण्यातले दोन विमानतळ या सरकारने रद्द केले. आज 4 महिने झाले, नवीन इमारत तयार आहे, पण उद्घाटन मात्र झालं नाही. का नवं विमानतळ सुरू झालं नाही? अनेक प्रकल्प तयार आहेत. पण या खोके सरकारला उद्घाटन करायला वेळ नाही. कारण VIP ची तारीख मिळत नाही. शहरं कोलमडत चालली आहेत. राज्यात भ्रष्टाचार सुरू आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यातलं कृषी, उद्योग, शिक्षण आरोग्य सगळं कोलमडले आहे, अशी टीका त्यांनी केली.
आधी ओरडत होते आम्हाला वित्त मिळत नाही, वित्त मिळत नाही. आता वित्त खातं नेमकं कोणाकडे आहे? शेवटी राष्ट्रवादी पवार साहेबांचीच आहे. आमचं सरकार का पाडलं हे या चाळीस चोरांनी सांगावं. आपलं राज्य कुठं जात आहे?
जे पालकमंत्री पद तुम्ही भांडून, लढून मिळवलं होतं ते पालकमंत्री पद तुमचं गेलं. तुम्ही काय केलं?, असा सवाल त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना केला. आपल्या आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. आम्ही जी वचने देतो ती पूर्ण करतो. कर्ज मुक्तीचा निर्णय आपण घेतला. कोव्हिडमध्ये आपण काम केलं. सगळ्याना सुखरूप ठेवलं हे आपलं हिंदुत्व आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.