पुणे: राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. येत्या एक-दोन दिवसांत राज्यातील सर्व भागांमध्ये कोरडे हवामान राहील. कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना काही काळ उष्णतेचा त्रास सहन करावा लागेल.
तत्पूर्वी बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी राज्यातील काही भाग वगळता सर्वत्र पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली होती. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मनाबाद या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.
औरंगाबाद शहरात परवा रात्रीपासून काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. शहरासह वाळूज परिसरात परवा रात्री दहा वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दौलताबाद, खुलताबाद, सोयगाव परिसरालाही रात्री अकरानंतर मध्यम ते मुसळधार पावसाचा फटका बसला. त्यामुळे मान्सून एकदाचा परतला म्हणत निःश्वास टाकलेल्या शेतकरी आणि नागरिकांना पुन्हा एकदा नव्या संकटाला सामोरे जावे लागले.
औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात काल रात्री दहानंतर पाऊस सुरु झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह बरसात झाली. यामुळे औरंगाबाद शहराची तसेच खुलताबाद, दौलताबाद परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान मध्यरात्रीतून काही ठिकाणी पुरवठा सुरळीत झाला तर काही ठिकाणी अजूनही वीज पुरवठा खंडित झाले आहे. लोणीखुर्द परिसरात 17 ऑक्टोबर रोजी पहाटेपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरु झाली. त्यामुळे सोयाबीन, मका, कपाशी, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील काही भागाला जवाद चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र हवामान स्थिती बदलल्यामुळे या वादळानं दिशा बदलली. म्हणून महाराष्ट्रात तरी या वादळाचा फटका बसणार नाही, अशी चिन्हे होती. मात्र बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राचा पश्चिम भाग, कोकण किनारपट्टी वगळता कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत या पावसाची तीव्रता वाढेल. या काळात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाची तीव्रता कमी होत जाईल आणि त्यानंतर हळू हळू थंडीची सुरुवात होईल, असा अंदाज औरंगाबाद येथील हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अखंड बरसातीमुळे औरंगाबाद जिल्ह्याची भूजल पातळी साडेसहा फुटांनी वाढली आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाई होण्याची चिन्हे नाहीत, असे म्हटले जात आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 14 फुटांनी भूजल पातळी वाढली आहे.
इतर बातम्या-