रणजित जाधव, नारायणगाव, पुणे | 12 ऑक्टोंबर 2023 : राज्यात सध्या मुख्यमंत्रीपदाची धुरा एकनाथ शिंदे सांभाळणार आहे. भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार आहे, यासंदर्भात चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून आपआपल्या नेत्याचा दावा केला जातो. परंतु मुख्यमंत्री कोण होणार? हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले आहे. शिरूर लोकसभेत ‘घर चलो अभियान’ अंतर्गत बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
‘अजित दादा’, मुख्यमंत्री झाले तर सर्वात पहिला हार मी घालेन, असे सुप्रिया सुळे यांनी नुकतेच म्हटले होते. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात भाऊ-बहिणीचे नाते आहेत. परंतु सुप्रिया सुळे जे बोलल्या ते खरोखरच मनातून बोलल्या का? त्यांना एक सेकंद ही अजित पवार चालत नाहीत. ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर अजित पवार यांना अंडर इस्टीमेट करण्यासाठीच सुप्रिया सुळे यांनी असे वक्तव्य केले असेल.
बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या कुटुंबातील उमेदवार असेल का? असे विचारल्यावर बावनकुळे यांनी सांगितले की, मी एवढेच सांगेल, बारामतीत महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार 51 टक्के मते मिळवून विजयी होणार आहे. बारामतीमध्ये उमेदवार कोण असणार? याचा निर्णय पार्लमेंट्री बोर्ड घेणार आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून शरद पवार यांनी अनेक प्रयत्न केले. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे, हे आम्हाला अजित पवार आणि छगन बुजबळ यांनीच सांगितले आहे. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या रथाची घौडदौड सुरु आहे. हा रथ थांबवण्यासाठी शरद पवार यांनी किती ही प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही.
आता मुख्यमंत्री कोण असणार? यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे वाटते. तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान होतील, असे वाटते. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत. त्यात काहीच गैर नाही. प्रत्येक नेत आणि कार्यकर्ता आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र पुढील निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पार्लमेंट्री बोर्ड घेईल. बोर्ड ठरवेल तोच मुख्यमंत्री होईल.