पुणे, दि. 28 नोव्हेंबर 2023 | राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. पाऊस आणि गारपीटमुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यांत का पाऊस पडत आहे? हा प्रश्न शेतकऱ्यांप्रमाणे सर्वसामान्यांनाही पडला आहे. गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्यात पाऊस पडण्याचा घटना वाढत आहे. त्याला कारण पश्चिम आणि पूर्वेकडील वारे आहेत. दोन्ही वारे महाराष्ट्रात भिडत आहेत. यामुळे हिवाळ्यात गारपीट आणि पाऊस पडत आहे, असे हवामान तज्ज्ञ आणि भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉक्टर रंजन केळकर यांनी म्हटले आहे.
नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडत आहे. पावसाचे प्रमाण ओळखून शेतकऱ्यांनी पिके घ्यावीत. या पावसाला अवकाळी म्हणता येईल. पुणे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ३० मिमी पावसाची नोंद गेल्या काही वर्षांत झाली आहे. भारतात गारा पडण्याच्या घटना वारंवार घडत नाहीत उत्तर भारतात हिवाळ्यात हिमवृष्टी होते. परंतु हिवाळ्यात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. नोव्हेंबरमध्ये असे वातावरण नेहमीच असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कधी कोणते हवामान असते, हे ओळखून पिके घ्यावीत.
भारत उष्ण कटीबंधीय देश आहे. उष्ण कंटीबंधाचे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. शीत कटीबंधाचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. एकीकडे शीत व शुष्क हवा तर दुसरीकडे उष्ण आणि दमट हवा यांची देवाणघेवाण होते. यामुळे वादळी पावसासह गारपीट होते.
राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरु राहणार आहे. यामुळे आणखी पिकांना फटका बसू शकतो. अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तक्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे गुजरातमध्ये अनेक भागांत अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे राज्याच्या विविध भागांत वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला आहे.