पुणे: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात जोरदार सभा पार पडली. राज ठाकरे यांच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मधल्या काळात राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला (Ayodhya tour) भाजपचे (BJP) खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. त्यात त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे राज ठाकरे या भाषणात मधल्या काळातील सर्वच मुद्द्यावर बोलतील आणि विरोधकांचा समाचार घेतील असं वाटत होतं. पण राज यांनी आजच्या भाषणात पाच मुद्द्यांना हातच घातला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज ठाकरे यांनी सबुरीचं धोरणं स्वीकारलं की या मुद्द्यांना हात न घालण्यामागे काही स्टॅटेजी आहे? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
राज यांनी आजच्या भाषणात अयोध्येचा दौरा का स्थगित करण्यात आला याची माहिती दिली. यावेळी एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो हे कसं शक्य आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. या संपूर्ण तासाभराच्या भाषणात त्यांनी एकदाही बृजभूषण सिंह यांचं नाव घेतलं नाही. राज ठाकरे आजच्या भाषणात बृजभूषण सिंह यांच्यावर सडकून टीका करतील, त्यांना आव्हान देतील अशी अपेक्षा होती. पण मनसैनिकांचा पुरता हिरमोड झाला. राज ठाकरे यांनी बृजभूषण सिंह यांना ललकारने सोडा त्यांचं नावच घेतलं नाही. त्यामुळे मनसैनिकांनाही आश्चर्य वाटलं. उलट राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यामागे मोठा ट्रॅप होता असं सांगून त्यांनी मनसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. हा दौरा रद्द करण्याचे त्यांनी दोन कारणं सांगितली. एक म्हणजे अयोध्या दौऱ्यात ट्रॅप आखला गेला होता. मनसैनिकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मागे कोर्टाचा ससेमिरा लावण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज यांनी केला. तर, दुसरं कारण त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेचं दिलं. शस्त्रक्रियेनंतर तीन चार आठवडे आराम करावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, अयोध्या दौऱ्याची नवी तारीख त्यांनी जाहीर केली नाही. दिवाळी नंतर अयोध्येला जाण्याबाबतही त्यांनी सूतोवाच केलं नाही. उलट तुम्ही जो पायंडा पाडत आहात तो चुकीचा आहे. असा पायंडा पाडू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे राज यांनी अयोध्येचा दौरा आता पूर्णपणे स्थगित केल्याचे संकेत मिळत आहेत.
राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून आघाडी सरकावर टीका केली. पण औरंगजेबाची कबर ज्या अकबरुद्दीन ओवैसींमुळे चर्चेत आली. त्यावर त्यांनी काहीच भाष्य केलं नाही. राज यांनी एमआयएमवर टीका केली. एमआयएमला वाढवत असल्याबद्दल शिवसेनेवर टीका केली. पण अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादेत येऊन राज ठाकरे यांना कुत्ता वगैरे म्हटलं. त्यावर राज यांनी एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. राज ठाकरे हे ओवैसींवर तुटून पडतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी त्यावरही भाष्य केलं नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतल सभेत काही लोकांना अंगावर शाल घेतल्याने आपण बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटत आहे, अशी राज यांच्यावर टीका केली होती. राज यांची त्यांनी मुन्नाभाई अशी संभावना केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेचा राज ठाकरे समाचार घेतील असं वाटत होतं. मात्र, राज यांनी या टीकेवर एकही शब्द काढला नाही. नाही म्हणायला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचा दावा केला होता. तुम्ही आता टिळकांनाही ब्राह्मण म्हणून पाहणार का? असा सवाल राज यांनी शरद पवार यांना केला होता. त्यानंतर राज्यातील इतिहासकार आणि इतिहास संशोधकांनी पुरावे सादर करत राज यांचा दावा खोडून काढला होता. शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली. महात्मा फुलेंनीच पहिली शिवजयंती साजरी केली. टिळकांनी समाधीचा जीर्णाोधार करण्यासाठी निधी गोळा केला. त्यांच्याच बँकेत हा निधी ठेवला आणि नंतर बँक बुडित निघाल्याचं सांगितलं. त्यामुळे समाधीचा जीर्णोधारा झाला नाही, असं इतिहासकारांनी सांगितलं. इतिहासकारांनी राज ठाकरे यांचा इतिहास कच्चा असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे राज याबाबत बोलतील असं वाटत होतं. पण त्यांनी या मुद्द्यालाही हात घातला नाही.