पुणे: राज्याला मास्क मुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र (maharashtra) लवकरच मास्क मुक्त होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी या चर्चा धादांत खोट्या असल्याचं सांगितलं. मंत्रिमंडळात मास्क (mask) बाबत साधी चर्चाही झाली नाही. निर्णयही झाला नाही. या सर्व खोट्या बातम्या आहेत. त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्वच मास्क कायम ठेवण्याच्या मताचे आहोत. बाहेरच्या देशात मास्कची सक्ती उठवल्यानंतर त्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे मास्क हे राहिलंच पाहिजे असं आमचं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार आज पुण्यात होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील कोरोना संसर्ग कमी झाला आहे. ग्रामीण भागात 15 ते 18 वयोगटातील मुलांचं 86 टक्के लसीकरण झालं आहे. त्या तुलनते पुणे शहर, पिंपरी चिंचडवडमध्ये लसीकरण कमी झालं आहे. 90 हजार सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत, तरी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन दुसऱ्या लाटेच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. 87 हजार रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. 1 कोटी 61 लाख 16 हजार लोकांचे लसीकरण जिल्ह्यात झालं आहे, अशी माहिती देतानाच दोन दिवसापासून पुण्यात रुग्ण कमी होत आहेत, ती अजून कमी व्हावी ही अपेक्षा आहे, असं अजित पवार म्हणाले.
पुण्यातील शाळा येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. पहिली ते आठवीच्या शाळा आठवडाभर हाफ डे असतील. त्यानंतर आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं बंधनकारक नाही. ते पालकांवर अवलंबून आहे. आम्ही पालकांना जबरदस्ती करणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं. इयत्ता पहिली ते 8 वीपर्यंतची शाळा दुपारी 4 पर्यंतच सुरू राहिल. दुपारी विद्यार्थ्यांनी घरी जाऊनच जेवण घ्यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मास्क काढूच नये हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे. इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले. तसेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचं शाळेतच लसीकरण केलं जाणार आहे. याबाबतची माहिती शाळा चालक आणि संचालकांना देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
वाईन आणि दारू यात फरक आहे. द्राक्ष आणि काजूतून वाईन तयार केली जाते. अनेक फळातून वाईन तयार केली जाते. वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जेवढी तयार होते तेवढी आपल्याकडे खपत नाही. बाहेरच्या राज्यात किंवा परदेशात निर्यात केली जाते. काही देशात पाण्याऐवजी वाईनच पितात. पण काहींनी मद्यराष्ट्र म्हटलं आहे. मध्यप्रदेशात तर घरपोच वाईन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षाची मागणी आहे. वाईन विकण्यासाठी काही नियम अटी घालून परवानगी दिली आहे. पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याची नियमावली तयार होईल. पण काही लोकांनी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/tmK55ifctF#Corona |#NewsUpdate | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 29, 2022
संबंधित बातम्या: