सांगली : महाराष्ट्रात पुरुषांप्रमाणे प्रथमच महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra kesri kusti spardha) घेण्यात येणार आहे. परंतु महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुण्यात कुस्तीगीर महासंघाच्या अस्थायी समितीने 6 एप्रिलला स्पर्धा घेण्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडूनही स्पर्धेच्या नवीन तारखा आणि नवीन शहराची घोषणा केली आहे. कुस्तीगीर परिषदेने सांगलीत 23 व 24 मार्चला स्पर्धा होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळेच प्रथमच होणारी महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवर्यात सापडली आहे.
राज्यात पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी यासंदर्भात घोषणा केली. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगीरास महिला केसरी ‘किताब आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.स्पर्धा सलग तीन दिवस चालणार असून राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील 45 महिला संघ सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यातील संघाकडून 10 महिला कुस्तीगीर असे एकूण 450 महिला कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. तर प्रत्येक जिल्हा तालीम संघाचा एक व्यवस्थापक, एक मार्गदर्शक असे 10 जणांचा समावेश असणार आहे.
सांगलीनंतर पुण्याची घोषणा
सांगलीनंतर पुणे येथेही महिलांची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा घेण्याची घोषणा करण्यात आली. पुण्यात कुस्तीगीर महासंघाच्या अस्थायी समितीने 6 एप्रिलला स्पर्धा होणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे अधिकृत स्पर्धा कोणाची? पुणे की सांगली हा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रथमच होणार महिलांची स्पर्धा
महाराष्ट्र केसरी स्पर्धा राज्याच्या इतिहासात प्रथमच होणार आहे. या संदर्भात सांगली जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन माहिती देऊन चर्चा करण्यात आली आहे. तर या स्पर्धेसाठी आवश्यक ते सहकार्य करू असे आश्वासन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले आहे, यावेळी सांगली जिल्हा तालीम संघ चे अध्यक्ष पै नामदेवराव मोहिते,संपतराव जाधव,विलास शिंदे,प्रतापराव शिंदे,राजाराम पवार,हणमंत जाधव,विनायक पाटील हे उपस्थित होते.
महिलांना मोठी संधी
देशाला कुस्तीत महिला मल्लांनीही अनेक पदकं मिळवून दिली आहेत. हरियाणातील गीता फोगाट आणि इतर फोगाट बहिणींवर तर दंगलसारखे सिनेमे बनले आहेत. त्यामुळे पूर्वीचा दृष्टीकोण बदलत असून कुस्ती क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलींची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक मुली सध्या या क्षेत्राकडे करिअर आणि छंद या दोन्ही दृष्टीकोणातून पाहत आहेत. त्यामुळे या स्पर्धा महिला मल्लांसाठी मैलाचा दगड ठरू शकतात. कुस्ती क्षेत्रासाठी हे एक मोठं पाऊल ठरेल. परंतु त्यापूर्वी दोन शहरांमधील आयोजनाचा वाद मिटवायला हवा.