पुणे : कोयता हल्ला प्रकरणात एका तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे याच्यावर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अगदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लेशपाल जवळगे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून लेशपालने त्या तरुणीचा जीव वाचवला. मात्र, त्यावरून आता लेशपालला इन्स्टावर ट्रोल केलं जात आहे. त्या आरोपी तरुण आणि तरुणींची जात कोणती? असा सवाल लेशपालला इन्स्टावरून केला जात आहे. त्यांना लेशपालनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
कोयता हल्यातील मुलीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगेची इन्स्टा स्टोरी चर्चेत आली आहे. ‘त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धिजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरच्या थोड्याफार असलेल्या भागाला, अशी जळजळीत टीका लेशपाल जवळगेने व्यक्त केली आहे.
यूजर्सने थेट लेशपालला त्या तरुण आणि तरुणीची जात विचारली आहे. त्यामुळे लेशपाल संतापला आहे. मात्र, इन्स्टावरही त्याच्यावर सर्वाधिक कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रत्येकजण त्याचं कौतुक करत आहे. लेशपालच्या धाडसाला सलामही करत आहे.
दरम्यान, लेशपाल याच्या या धाडसी कृत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील या दोन युवकांना प्रत्येकी 5 लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. पुण्यातील युवतीला कोयता हल्ल्यातून वाचवणाऱ्या दोन युवकांना प्रत्येकी 5 लाख बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी याबाबतची माहिती दिली.
पुण्यात एका तरुणाने एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन तरुणांनी या मुलीला वाचवलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मुलांना बक्षीस जाहीर केलं असून बक्षिसाची रक्कम देण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. दोन ते तीन दिवसात मी ते बक्षिस या दोन्ही युवकांना देणार आहे, असं शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सांगितलं.