अभिजित पोते, पुणे : पुणे शहरात दर्शना पवार हिची हत्या झाल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शनाने तिचा मित्र असलेल्या राहुल हंडोरे याला लग्नास नकार दिला. त्यामुळे दर्शनाची हत्या झाली. त्यानंतर मंगळवारी २७ जून रोजी पुन्हा युवक-युवतीवर हल्ला झाला. त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाला. परंतु यावेळी पुणेकरांनी हल्ला करणाऱ्या तरुणाला पुणे स्वाद दाखवत चांगलाच चोप दिला. त्यामुळे त्या तरुणीचे प्राण वाचले अन्यथा पुणे शहरात पुन्हा अनर्थ घडला असता. त्या माथेफिरु तरुणास धाडसाने ताब्यात घेणाऱ्या युवकाचे कौतूक होत आहे.
पुणे शहरातील सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी युवक अन् युवतीवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला. कोयत्याने हा हल्ला झाला आहे. अगदी पेरुगेट पोलीस चौकीजवळ ही घटना घडली आहे. या ठिकाणी युवक अन् युवती गाडीवरुन उतरले. त्यावेळी शंतनू जाधव नावाचा व्यक्ती कोयता घेऊन त्याचा मागे धावत आला. त्याने दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. युवक एका दिशेला पळाला तर युवती दुसऱ्या दिशेला पळाली. शंतनू त्या युवतीचा मागे धावत होतो. तो तिच्यावर प्राणघात हल्ला करणार तोच काही युवकांनी त्याला पकडले. त्याच्याकडून कोयता हिसकवून त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या हवाली केले.
पोलिसांनी आरोपी शंतनू जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आरोपी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. भादवि ३०७ कलमा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जखमी तरूणीवर उपचार पूर्ण झाले आहे. पुणे शहरात घडलेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात त्यांनी घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे म्हटले आहे. आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.