‘घर का भेदी लंका ढाए’ ही हिंदीतील प्रसिद्ध म्हण आहे. या म्हणीचा अर्थ सोपा आहे. आपापसातील फुटीमुळे नुकसान होणं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे घडतंय, त्यामुळे दोन्ही गटांचं वैयक्तिक मोठं नुकसान आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी तशी खेळी करावी यासाठी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची देखील मागणी आहे. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार आता त्यांच्या हुकमी एक्काला बारामतीत उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची त्याबाबतची मागणी करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय किंवा केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील नणंद-भावजयीच्या लढतीनंतर आता काका-पुतण्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासमोर केली आहे. शरद पवार यांचे नातू अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघात उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेत याबाबत मागणी केली आहे. शरद पवार आणि युगेंद्र पवार हे आज एकत्र बारामतीच्या पक्ष कार्यालयात उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी याबाबतची मागणी केली. कार्यकर्त्यांच्या याबाबतच्या संभाषणाचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कार्यकर्ते – युगेंद्रदादांपेक्षा कुणीच चांगला उमेदवार नाही. युगेंद्रदादांना उमेदवारी मिळावी ही आमची इच्छा आहे.
शरद पवार – आम्ही चर्चा करु.
कार्यकर्ते – तुम्ही फक्त युगेंद्रदादांना ताकद द्या. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. आमचं दादांवर लक्ष आहे. आता फक्त तुमचं दादांवर लक्ष ठेवा. कारण आम्हाला आता दादा बदलायचा आहे. आम्हाला शांत दादा आणायचा आहे.
युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. अजित पवार यांचे लहान बंधू श्रीनिवास पवार यांचे ते पुत्र आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली असली तरी त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी शरद पवार यांच्या पाठिमागे उभं राहण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना घरचा आहेर देत टीका केली होती. याच श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे देखील आपले आजोबा शरद पवार यांच्यासोबत आहेत. ते बारामती विद्या प्रतिष्ठानाच्या विविध उपक्रमांमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.