मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तपास यंत्रणांच्या धाडी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. तुम्हाला सत्ता पाहिजेत ना. सगळ्यांच्या समोर सांगतो. पेनड्राईव्ह गोळा करू नका. ज्यांना पाहिजे त्यांना पेनड्राईव्ह द्या. मी तुमच्यासोबत येतो. सत्तेसाठी येत नाही. याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार, कुटुंबीयांवर धाडी टाक हे जे काही तुम्ही जे चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात, असं खुलं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं. मी तुमच्या कुटुंबाचे कधी भानगडी काढल्या? याचं शेपूट त्याला, त्याचे शेपूट त्याला जोडलं जातं आहे. एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात. मी थोडसं भावनिक बोलतो. बाबरीच्या (babri masjid) खाली राम जन्मभूमी (ram janmabhoomi) होती. तसे कृष्णजन्मभूीच्या खाली काही तुरुंग असेल तर बघा. तिथे मला टाका. मी कृष्ण नाही. पण तुम्ही कंस बनू नका, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. बाळासाहेबांना काय उत्तर देणार असं मला विचारलं जातं. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं ते तरी काय उत्तर देणार. देशात सर्व सांगत होते हे नको… हे नको. तेव्हा बाळासाहेब म्हणाले हे राहू द्या. काय उत्तर देणार. 2006 साली मी हिंदू होतो, आजही आहे. तुरुंगात टाकणार असाल तर मी सर्वांची जबाबदारी घेतो. माझ्या शिवसैनिकांचीही घेतो. टाका मला तुरुंगात. पण ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली, त्यांचा छळ कशासाठी? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि देशमुखांच्या मांडीला मांडी लावून बसला असता की नाही? आम्ही तुमच्या गळ्यात पट्टा बांधला असता तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहात ही नाीच विकृत आणि निंदणीय गोष्ट आहे. मर्द असेल तर अंगावर ये, बघतो तू आहे आणि मी आहे. आता कळत नाही शिखंडी कोण आणि मर्द कोण. याला मर्दपणा म्हणत नाही. घराघरातील कुटुंबाला बदनाम करायचा. धाडी टाकायचा. मागे गडकरी म्हणाले, आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. तुमच्याकडे ह्यूमन लॉन्ड्रिंग सुरू केलंय का? म्हैसूर साबण लावायचा, बघा झाला स्वच्छ, असं त्यांनी सांगितलं.
हे सर्व होतंय असं समजू नका की कोण बघत नाही. महाभारतात धृतराष्ट्र होता. तसा हा धृतराष्ट नाहीये. हा महाराष्ट्र आहे. अशा वाटेला जाऊ नका. यातून कोणाचं भलं होत नाही. मी घाबरलोय म्हणून मी बोलत नाही. ही संधी आहे. इथे अनेकांना यायचं असतं पण येता येत नाही. मतभेद असेल तर सांगा. सूचना सांगा आमच्यात गुन्हेगार असेल तर सांगा, असं आवाहनही त्यांनी केलं.
अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या मेहबूबा बाई भारत माता की जय, वंदे मातरम म्हटलं की काय असं वाटलं होतं. तसं झालं असतं तर आम्ही त्यांच्या दर्शनाला आलो असतो, असा चिमटाही त्यांनी भाजपला काढला. तुम्ही मुदस्सीर लांबेंचा विषय काढला. दाऊदचा माणूस म्हटलं. लांबे के लंबे हात म्हणाला. फडणवीसजी, तुम्ही दर्ग्यात त्यांच्यासोबत फोटो काढला हार घालताना. त्यावेळी तुमच्यासोबत क्रांतीकारक होते. माझा तुमच्यासोबत फोटो आहे, मोदींसोबत फोटो आहे. त्याने काय होत नाही. लग्नात फोटो काढला म्हणून संबंध जोडता येत नाही. लांबेंच्या नेमणुकीच्या पत्रावर सही हिरव्याशाहीत केली आहे. विनोद तावडे यांनी सही केली आहे. तो कागद आमच्याकडे आहे. या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. धर की ठोक करून चालणार नाही. एखाद्याला तू वाईट आहे सांगण्यापेक्षा तू किती चांगला आहे हे दाखवून द्यावं लागतं, असा हल्लाही त्यांनी चढवला.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : आमदारांच्या पेन्शन बाबत पंजाब सरकारचा मोठा निर्णय