मुंबई : ममता बॅनर्जींनी मुंबई दौऱ्यावर असताना काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर एक तोफ डागली आणि त्याचे पडसाद अजूनही राज्यात उमटत आहे. ममता बॅनर्जींना अनेक काँग्रेस नेते उत्तर देताना दिसून आले. त्यानंतर आता भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उडवली आहे. भाजप नेत्यांकडून काँग्रेसची खिल्ली उडवण्याचं काम सध्या सुरू झालं आहे. परदेशात राहून राजकारण होते का? असं विधान ममता बॅनर्जींनी राहुल गांधी यांच्या बाबत केलं होतं, त्यावर अजूनही राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
पवार-ममतांच्या भेटीवर विखेंची टीका
ममता बॅनर्जींनी मुंबईत आल्यानंतर अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी हे विधान राहुल गांधी यांच्या बाबतीत केलं होतं. त्यावर आता भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी खरपूस टीका केली आहे. ममता बनर्जींच्या विधानाने काँगेसला स्वतःचे विसर्जन करण्याची वेळ आली आहे. एवढं होऊनही काँग्रेसचे लोक सत्तेत का टिकून आहेत ? असा सवाल विखे-पाटलांनी विचारला आहे. सत्तेचा मलिदा खाण्यासाठीच ही मंडळी सत्तेला चिटकून बसली आहे. पक्ष संघटना आणि पक्ष नेतृत्वाबद्दल अवमानकारक गोष्टी घडत आहेत, अशावेळी काँग्रेस सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवेल अशी अपेक्षा होत, असंही विखे पाटील म्हणालेत.
काढलेली पत्रके स्व. विलासराव देशमुखांच्या काळातली
काँग्रेस नेत्यांनी काढलेली पत्रके स्व. विलासराव देशमुखांच्या काळातली आहेत. पत्रके काढताना यांनी स्वतःची अक्कल देखील गहाण ठेवली, अशा शब्दात त्यांनी काँग्रेस नेत्यांचा समाचार घेतला आहे. काँग्रेसवर ओढवलेली नामुष्की पाहताना दुःख होतंय असंही विखे-पाटील म्हणालेत. विखेंच्या या विधानावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.