‘विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा अधिकार’, राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Dec 08, 2024 | 3:58 PM

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर हेच बाजी मारण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेतापदाची निवड होणार आहे. पण महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना त्यासाठी एकत्र येऊन महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. याबाबत राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा अधिकार, राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य
राहुल नार्वेकर
Follow us on

महाराष्ट्रात सत्तांतरानंतर आता विधीमंडळाचं विशेष अधिवशेन सुरु आहे. या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या दोन दिवसांत सर्व 288 आमदारांकडून आपल्या आमदारकीचा आणि गोपनीयतेची शपथ घेण्यात आली. तसेच विधानसभेचे नवे अध्यक्ष निवडण्यासाठीदेखील आता निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी आज उमेदारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपचे राहुल नार्वेकर यांनी यासाठी अर्ज दाखल केला आहे. इतर कुणी अर्ज केला नसल्यामुळे राहुल नार्वेकर हेच विधानसभा होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. असं असताना आता राहुल नार्वेकर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर यांनी यावेळी विरोधी पक्षनेता निवडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. खरंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला कमीत कमी 29 ही आमदार निवडून आणता आलेले नाहीत. त्यामुळे विधानसभेचा विरोधी पक्षनेता पदासाठी एकही पक्ष पात्र नाही. पण तीनही पक्षांनी एकत्र मिळून निर्णय घेतला तर विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीच्या एका आमदाराला मिळू शकतं. याबाबत राहुल नार्वेकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.

“मी सर्वांचे आभार मानतो. कुठल्याही गोष्टीची जबाबदारी दिली जाते तेव्हा मेरीटवर दिली जाते आणि त्यातून माझी निवड झाली. लोकशाहीवर विश्वास नाही म्हणून विरोधकांकडून आंदोलन केलं जातंय. विरोधात निकाल आला तेव्हा निवडणूक आयोगावर खापर फोडायचे. संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि याची काळजी घेणं गरजेचं आहे”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

विरोधी पक्षनेता पदाबाबत नार्वेकर काय म्हणाले?

“माझ्यावर देखील टीका झालेल्या. विरोधकांनी माझ्यावर टीका करण्या व्यतिरिक्त काही केलं नाही. मी उद्यापासून विधानसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडेल, तेव्हा साथ लाभेल अशी आशा आहे. मी कोणताही पक्षपात न करता निर्णय घेणार.
विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असतो. नियमात ज्या गोष्टी असतील त्याद्वारे गोष्टी होत असतात. माझ्याकडे गोष्टी आल्यास आम्ही विचार करुन निर्णय घेऊ. २८८ आमदारांना न्याय दिला नाही तर जनतेबरोबर अन्याय होतोय असं वाटेल. संसदीय लोकशाहीसाठी फार महत्त्वाचं आहे ते सर्वांना न्याय देणं”, अशी भूमिका राहुल नार्वेकर यांनी मांडली.

“माझ्या कार्यकाळात सर्वाधिक लक्षवेधी मांडल्या गेल्यात. डिजिटलायझेशन देखील सर्वाधिक माझ्या काळात झालं. अडीच वर्षात सकारात्मक काम झालं आणि त्यादृष्टीने पुढील ५ वर्ष देखील प्रयत्न असेल. सेन्ट्रल व्हिस्टा संदर्भात लवकरच विचार करत नव्या विधान भवनासंदर्भात निर्णय विचाराधीन आहे”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.