पनवेल : तुम्ही वर्दळीच्या रेल्वे स्थानक परिसरातून चालला आहात. तुमच्या रोजची पायाखालची वाट असल्यामुळे तुम्हाला रात्रीच्या अंधाराचीही भीती राहिलेली नसते. अशा परिस्थितीत जर तुमच्यासमोर अचानक एखादे महाकाय जनावर उभे राहिले तर… नुसती कल्पना करूनही अंगावर काटा उभा राहिला असेल ना. पण हाच भयानक अनुभव पनवेलजवळील आपटा रेल्वे स्थानक (Apta Railway Station) परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी काल रात्री घेतला आणि सर्वांचीच भीतीने पुरती गाळण उडाली. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून चाललेल्या रहिवाशांना भर रस्त्यात एका महाकाय अजगर रस्ता ओलांडताना दिसला आणि हा अजगर पाहणाऱ्यांची बोलतीच बंद झाली. तो अजगर तेथून दूर जाईपर्यंत त्या रहिवाशांनी परमेश्वराचा धावा सुरु केला. अखेर अजगर (Python) तेथून दूर गेला आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्या महाकाय अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याला पाहून कुणाच्याही तोंडून ”अबब….!” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली नाही तर नवल. (A 9 feet python was spotted near Apta railway station on Friday night)
पनवेलपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या आपटा रेल्वे स्थानक परिसरात शुक्रवारी रात्री महाकाय अजगर दिसला. हा अजगर तब्बल 9 फूट लांब होता. रस्त्यावर स्ट्रीट लाईट होती. मात्र तिचा पुरेसा प्रकाश न पडलेल्या भागात अंधारातून हा अजगर वळवळ करीत एका बाजूने दुसऱ्या बाजूला चालला होता. अजगराचे तोंड दिसताच तेथील प्रत्यक्षदर्शींची घाबरगुंडी उडाली होती. मात्र एवढा मोठा अजगर आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह काहींना आवरता आला नाही. त्यातील एका धाडसी तरुणाने स्वतःच्या मोबाईलमधून अजगराचा व्हिडीओ बनवला. नंतर या अजगराची बातमी वाऱ्यासारखी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पनवेल शहरात पसरली आणि परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले. सध्या या अजगराचा व्हिडिओ पनवेलबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
पनवेलच्या ग्रामीण भागात अधूनमधून साप, नाग आणि अजगर अशा सरपटणाऱ्या जनावरांचे दर्शन होत असते. लोकवस्तीत अशा जनावरांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे रहिवाशांना रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणे असुरक्षित बनले आहे. यापूर्वी रसायनी-आपटा कोळीवाडा गावात 8.5 फूट अजगर दिसला होता. त्यानंतर पुन्हा एकदा महाकाय अजगर दिसल्यामुळे आपटा परिसर तसेच पनवेलच्या ग्रामीण भागातील लोक सध्या रात्री जाताना काळजी घेत आहे. रहिवाशांनी रात्रीच्या सुमारास आपल्या मुलांना घराबाहेर पडू देऊ नये, असे आवाहन वन खात्याकडून केले जात आहे. (A 9 feet python was spotted near Apta railway station on Friday night)
इतर बातम्या
Titwala Fighting : किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घातला, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल