मुंबई : बांबू लागवड हा शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारा पर्याय आहे. एम-इंडीकेटर (m-indicator app ) या मोबाईल रेल्वे वेळापत्रक अॅपचे जनक सचिन सुर्यकांत टेके यांनी बाबूंच्या शेतीचा ( Bamboo Cultivation ) एक आगळा प्रयोग केला आहे. कोरोनाकाळात त्यांनी रायगड ( Raigad ) जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात ढोकशेत गावात बांबूची लागवड केली आहे. एका तरुणाने शेतकऱ्यांसाठी बांबू शेतीचे आगळे दालन उपलब्ध केले असून त्यासाठी त्यांनी 13 मे रोजी सुधागड ( sudhagad taluka ) येथे परिसंवादाचे आयोजन केले आहे.
बांबू लागवडीविषयी सध्या बरीच चर्चा चालू असून बांबू लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे म्हणून शासनाने देखील विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. राज्याच्या विविध भागांतील शेतकरी बांबू लागवडीकडे वळत आहेत. एम-इंडिकेटर या मोबाइल अॅपचे निर्माते सचिन सुर्यकांत टेके आणि त्यांच्या पत्नी प्रतिक्षा सचिन टेके यांनी ढोकशेत ( तालुका सुधागड ) येथे साडेचार एकरात कोरोना काळात 2020 पासून बांबू लागवड करून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलेला आहे.
सचिन यांच्या ‘बांबूविश्व’ या बांबू बनात एकूण 1300 बांबूची लागवड केलेली आहे. त्यात मुख्यत्वे मानगा या प्रजातीची लागवड केली आहे. तसेच इतर 34 अनेकविध प्रजातींचे बांबू आहेत. बांबू लागवडी विषयी सुधागड तालुका तसेच रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून 13 मे रोजी एक निःशुल्क परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात बांबू लागवड, उत्पन्न, खर्च, मार्केट, जमीन, हवा पाणी, बांबूच्या विविध प्रजाती, रोपांची उपलब्धता, फायदा व तोटा यासंदर्भात परिपुर्ण मार्गदर्शन केले जाईल असे सचिन टेके यांनी सांगितले.
या परिसंवादात बांबू विषयातील तज्ज्ञ विनय कोलते यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. कोलते यांनी पुण्यातील भोर तालुक्यात बांबु पिकावर चांगले संशोधन केलेले आहे. त्यांची शेतकऱ्यांशी नाळ जोडलेली आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग परिसंवादात भाग घेणा-या शेतकऱ्यांना होईल अशी आशा आहे. हा कार्यक्रम बांबूविश्व, ढोकशेत-दहिगांव रोड, परळी, तालुका सुधागड, जि.रायगड येथे शनिवार दि. 13 मे रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे. या निःशुल्क परिसंवादात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन बांबूविश्वचे सचिन टेके यांनी केले आहे. परिसंवादाकरिता संपर्क: 8108112255