आक्रोश आणि फक्त आक्रोश, तरुणाने नाना पटोले यांच्यासमोर टाहो फोडला

| Updated on: Jul 20, 2023 | 6:15 PM

इर्शारवाडी गावाच्या एका तरुण प्रत्यक्षदर्शीने नाना पटोले यांना रात्री नेमकी घटना कशी घडली, याविषयी माहिती दिली. यावेळी त्याला अश्रू अनावर झाले. तो ढसाढसा रडू लागला. त्याचा आक्रोश पाहून नाना पटोले हे देखील सुन्न झाले.

आक्रोश आणि फक्त आक्रोश, तरुणाने नाना पटोले यांच्यासमोर टाहो फोडला
Follow us on

रायगड | 20 जुलै 2023 : खालापूर येथील इर्शाळवाडी येथे घडलेली घटना मन सुन्न करणारी आहे. डोंगराचा कडा तुटला आणि इर्शाळवाडी गावावर कोसळला. गावात 40 ते 45 घरं होती. या घरांमध्ये जवळपास 200 ग्रामस्थ वास्तव्यास होती. पण संपूर्ण गावावर दरड कोसळली आणि हाहा:कार उडाला. गावातील फक्त पाच ते सहा घरं वाचली. या संकटातून जे दहा ते बारा गावकरी वाचले त्यांनी आपल्या डोळ्यांदेखत आपल्या माणसांना दरडीच्या ढिगाऱ्यात अडकताना पाहिलं. अनेकांनी वाचवण्याचा प्रयत्नदेखील केला. पण संकट फार मोठं होतं. एकीकडे मुसळधार पाऊस सुरु होता. तर दुसरीकडे दरड कोसळलेली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज घटनास्थळी जावून ग्रामस्थांसोबत बातचित केली. यावेळी ग्रामस्थांनी रात्री घडलेला प्रसंग सांगत असताना नाना पटोले यांच्यासमोर टाहो फोडला.

“एकदम स्फोटासारखा आवाज आला. गडगड आवाज झाला. मी झोपलेलो होतो. माझ्या बाजूच्या भिंतीला धक्का बसला. मला जाग आली. नंतर भिंत माझ्याबाजूला यायला लागली, असं मला भासायला लागलं. मी एका खोलीत एकटा झोपलो होतो. बाजूच्या खोलीत माझा भाऊ, वहिणी आणि दोन लहान मुलं झोपली होती. मी त्यांच्याकडे धावत गेलो. तेवढ्यात बाहेरुन खालच्या बाजूला राहणारा माझा एक चुलत भाऊ ओरडायला लागला. वरुन दगडं पडत आहेत, पळा.. पळा…”, असं राजेंद्र नाना पटोले याना सांगू लागला.

तरुणाने टाहो फोडला, प्रचंड आक्रोश

“सगळी लोकं गाडली गेली वाटतं. अंधार भरपूर होतं आणि धूकंही भरपूर होतं. आमची काही पोरं गेली. त्यांनी भरपूर प्रयत्न केले. पण ढोपरा इतका चिखल होता. आम्हाला जाणं शक्य झालं नाही. शेवटी आमच्या मेहुण्याने आमच्या चुलत भावाला दोघा-तिघांना घरातून ओढून काढलं. त्यांची दोन-तीन वर्षांची मुलं कशीतरी चिखलातून ओढून काढली”, असं म्हणत तरुणाने टाहो फोडला.

हे सुद्धा वाचा

“माझ्या भावाला मेहुण्याने कसंतरी खेचून काढलं. त्याला थोडंफार लागलं आहे. पण बाकीचं गाव दबून गेले. ते सुद्धा आमचेच लोकं होती. 40-45 घरं होती. त्यापैकी आमचे फक्त पाच-सहा घरे राहिली”, असं राजेंद्र रडत-रडत नाना पटोले यांना सांगत होता.

“आम्ही सगळे आदिवासी समाजाचे आहोत. आमच्या गावात अडीचशे जणांची लोकवस्ती होती. लहान मुलं आश्रमात आहेत. एकूण सात घरं वाचली आहेत. आम्ही डोंगराच्या खाली रात्रीच आलो. आम्ही आमच्या गावातील इतर नातेवाईकांना तरुणांना फोन लावत होतो. पण त्यांना फोन लागत नव्हता. मग आम्हाला वाटलं की सगळी लोकं गाडली गेली असतील. आम्ही फक्त दहा-पंधरा लोकं वापस आलो. आम्ही घरोघरी फोन लावण्याचा प्रयत्न केला”, असं राजेंद्रने सांगितलं.

“बकरी, बैल, गुरे-ढोरं सगळे गेले. मामा, आजोबांचं संपूर्ण कुटुंब गेलं. आमच्या इथला एका लहान मुलाचे आई-वडील, मोठा भाऊ गेला. आम्ही सर्व एकत्र होतो. त्यांचे गेले म्हणजे आमचेपण गेलं”, असं म्हणत राजेंद्रला पुन्हा रडू कोसळलं. तो प्रचंड आक्रोश करत होता. त्याचा आक्रोश पाहून नाना पटोले देखील अवस्थ झाले.

गावकऱ्यांनी पुनर्वसनाची मागणी 2015 लाच केलेली

“पाऊस भरपूर पडत होता. एकावर्षी वेगळ्या साईटचं डोंगर पडलं होतं. आम्ही पुनर्वसनाची मागणी केली होती. आम्ही 2015 मध्ये पुनर्वसनाची मागणी केली होती. गेल्यावर्षी देखील आम्ही खाली झोपड्या बांधल्या होत्या. पण त्या झोपड्या फॉरेस्टवाल्यांनी तोडून टाकल्या”, असं गावकऱ्यांनी यावेळी नाना पटोले यांना सांगितलं.

“आम्हाला धमक्या यायला लागल्या. तुम्ही कशाला ठाकरे वरती राहा. आम्हाला थेट जातीवरुन बोलायला लागले. आदिवाशींना कोणी काय बोलला की तो गप्प राहतो. त्यामुळे आम्ही गप्प राहिलो. असं वाटतं की आदिवासी ढोर आहेत. त्यांना जंगलात ढोरासारखं जगावं, असं वाटतं लोकांना”, अशी उद्विग्नता तरुणाने व्यक्त केली.

 

“आमच्यातले 25 टक्के तरुण शिकलेले होते. आम्ही जॉबसाठी प्रयत्न करत होते. पण ते सुद्धा आम्हाला करु देत नाहीत. सर्व अकरावी, बारावी, तेरावी, पंधरावी पास आहेत. तीन जण पंधरावी पास झाले होते. पण तिघं गाडले गेले. आम्ही पुनर्वसन आणि नोकरी मागितली होती. नोकरी दिली नसती तरी चाललं असतं. पुनर्वसन झालं असतं तर मी कोणत्याही कंपनीत जॉब करु शकलो असतो”, असं गावकरी तरुण म्हणाला.

‘राजेंद्र, अरे तुमचं दु:ख मोठं आहे रे’, नाना पटोले अस्वस्थ

यावेळी नाना पटोले यांनी गावकऱ्यांना आपली ओळख सांगितली. त्यांनी गावकऱ्यांना धीर दिला. “राजेंद्र, अरे तुमचं दु:ख मोठं आहे रे. तुमच्यासमोर तुमचं कुटुंब गेलं. यापेक्षा मोठं दु:ख असू शकत नाही. मी याबाबत उद्या विधानसभेत मांडतो. मी तुम्हाला भेटायला आलो आहे”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.