IMD Prediction: राज्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस अन् गारपीट, आगामी तीन दिवसांबाबत आयएमडीचे महत्वाचे अपडेट

| Updated on: Apr 01, 2025 | 6:55 PM

IMD Weather Forecast : कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 आणि 5 तारखेला विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सातारा, जालना, संभाजीनगर जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता आहे.

IMD Prediction: राज्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस अन् गारपीट, आगामी तीन दिवसांबाबत आयएमडीचे महत्वाचे अपडेट
राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे
Image Credit source: TV 9 Marathi
Follow us on

IMD Weather Forecast : राज्यात मंगळवारी अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाची हजरी राज्यातील अनेक भागांत लागली आहे. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. दरम्यान हवमान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय हवामान विभाग अधिकारी एस. डी. सानप यांनी मध्य महाराष्ट्रात चक्रीवादळ निर्माण होत असल्यामुळे पाऊस सक्रीय झाल्याचे म्हटले आहे.

पुढील तीन दिवस पावसाचे

राज्यात मागील तीन दिवस ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर काही ठिकाणी दुपारपासून विजेच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली. याबाबत पुणे हवामान विभागाचे अधिकारी एस.डी. सानप यांनी सांगितले की, कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 आणि 5 तारखेला विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सातारा, जालना, संभाजीनगर जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता आहे. एकंदरीत पुढील 3 दिवस महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. घाट माथ्यासह शहरात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावतीसह पश्चिम विदर्भात पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

नांदेड जिल्ह्यात पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने 2 व 3 एप्रिल रोजी नांदेडला यलो अलर्ट दिला आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील काही भागात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कराडमध्ये गारपीट अन् पाऊस

कराडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी गारपीटदेखील झाली. कोल्हापुरातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. पन्हाळा तालुक्यात गारांचा वर्षाव झाला. कोल्हापूर शहरात सुद्धा ढगाळ वातावरण आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिरपूर परिसरात शेतकऱ्यांनी काढलेली हळद वाळवण्यासाठी शेतात पसरवली होती. मात्र अवकाळी पावसाने या हळदीचे मोठे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा, चिखली तसेच बुलढाणा तालुक्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.