अवकाळीमुळे पिके मातीमोल, शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अवकाळीची पाणी

| Updated on: Nov 28, 2023 | 10:59 AM

unseasonal rain in maharashtra | राज्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वच भागांत या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीतील हरभरा, गहू, तूर आणि भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे.

अवकाळीमुळे पिके मातीमोल, शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अवकाळीची पाणी
Follow us on

मुंबई, दि. 28 नोव्हेंबर 2023 | राज्यात दोन, तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. या गारपीटचा फटका रब्बी पिकांना बसला आहे. यंदा कमी पावसामुळे खरीप हंगाम चांगला आला नाही. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा होती. परंतु अवकाळीने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. रब्बी पिके झोपली आहे. सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पुणे जिल्हा | पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने 19 हजार शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील 11 हजार 227 हेक्टर क्षेत्रावर 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. भात, बटाटा, ज्वारी, कांदा, मका, भाजीपाला, द्राक्ष यांचं मोठ नुकसान झाले. सर्वाधिक 4817 हेक्टर नुकसान शिरूर तालुक्यात झाले. खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरुर तालुक्यात गारपीट आणि आवकाळी पावसाच्या संकटानंतर आता शेतकऱ्यांसमोर धुक्यांचे संकट आले आहे. धुक्यामुळे रोगराई निर्माण होणार आहे. त्याचा मोठा फटका पिकांना बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

विदर्भात फटका | वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापूस, तूर पिकाला फटका बसला आहे. पश्चिम विदर्भाला अवकाळीचा फटका बसला आहे. अमरावती विभागात ३५ हजार हेक्टरमधील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक नुकसान एकट्या बुलडाणा जिल्ह्यात झाले आहे. वाशिम जिल्ह्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. वाशिममध्ये कापूस, तूर, फळपीक ज्वारी आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

कोकणात पाऊस | रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सकाळपासून सरी पडत आहे. काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसाचा आंब्याच्या मोहरावर परिणाम झाला आहे. यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहे. आज दिवसभर कोकणात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या आहे.

सोलापूरमध्ये प्रचंड नुकसान | सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पावसाचे आगमन झाले. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मोहोळ तालुक्यात सकाळी साडेसहा वाजल्यापासून अवकाळी पावसाचे आगमन झाले. जिल्ह्यातील काढणीला आलेल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात नुकसान | परभणी जिल्ह्यात एका दिवसाच्या पवसाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. धाराशिव येथे विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.

उत्तर महाराष्ट्र | नंदुरबार जिल्ह्यातील ३६ पैकी २५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. शहादा, तळोदा अक्कलकुवा तालुक्यात अनेक छोटे-मोठे नद्यापावसामुळे प्रवाहीत झाल्या आहेत. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतात काढून ठेवलेला व काढणीला आलेल्या भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.