राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोर पाहायला मिळत आहे. साताऱ्यात रेड अलर्ड जारी करण्यात आला आहे. तर नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह पुणे, ठाणे, कल्याण या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. नवी मुंबईत सखल भागात पाणी साचलं आहे. दाना मार्केटमध्ये देखील पावसाचे पाणी शिरल्याने वापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर एकता नगर परिसरात महापालिकेकडून सतर्कता बाळगली जात आहे. याआधी निर्माण झालेली पूर सदृश्य परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून आत्तापासून महापालिकेचे कर्मचारी एकता नगर भागात लोकांना आवाहन करत आहेत. खडकवासला धरणातून आज सकाळी 27000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. सध्या तरी एकता नगर भागात सर्व परिस्थिती स्थिर आहे.
मुंबईत आज दिवसभर पावसाची बॅटिंग सुरूच राहणार आहे. मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मागील ४ तासांपासून मुंबईत सर्वदूर पावसाची रिमझिम सुरू आहे. आकाशात काळे ढग दाटून आल्याने मुंबईत मुसळधार पावसाचे संकेत आहेत. मरीन ड्राईव्ह परिसरात जोरदार हवा सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढलीये. समुद्राजवळ जाऊ नका असं आवाहन मुंबई मनपाकडून केले जात आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 27.57 अंश सेल्सियस असण्याची शक्यता आहे.
आज सकाळपासून मुंबई उपनगरात अधूनमधून पाऊस पडत आहे. पाणी भरल्यानंतर अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावलेली आहे. ढगाळ वातावरणासह काही भागात पाणी साचयला सुरुवात झाली आहे. तर सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे ठाणे – घोडबंदर रोड आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.