नाशिक/लासलगावः नाशिक जिल्ह्यातला निफाड तालुका पुन्हा एकदा गारेगार झाला असून, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात आज 11 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. दरम्यान, राज्यात या आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि थंडी असे विचित्र चित्र राहणार आहे. हवामान बदलाचा हा परिणाम आहे.
सध्या तामिळनाडूत चेन्नईजवळ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. सोबतच उत्तरेकडून हिमालयाच्या पायथ्यापासून थंड वारे थेट नाशिकच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात किमान 11 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. या थंडीचा हरभरा आणि गव्हाच्या पिकाला फायदा होणार आहे. मात्र, नागरिकांना कापरे भरत असल्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. दरम्यान, राज्यात काल बुधवारी नीचांकी तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली. तिथेही पारा 11 अंशापर्यंत घसरला, तर पुण्यात 11.8 तापमानाची नोंद करण्यात आली. आज गुरुवारी देखील हीच परिस्थिती राहणार आहे. एकीकडे थंडी वाढत असली तरी राज्यात अनेक भागात पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. रविवारीही राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे आहे पावसाचे कारण
सध्या दक्षिण अरबी समुद्रात एका कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती झाली आहे. दुसरीकडे चक्रीवादाळच्या तीव्रतेची जोड आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. हा पट्टा 11 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकेल. त्याची तीव्रता कायम राहणार आहे. हा पट्टा तामिळनाडू-आंध्र किनारपट्टीकडील करायल आणि श्रीहरी कोटा दरम्यान थांबेल. त्यात 13 नोव्हेंबर रोजी अंदमानच्या समुद्रातही कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. येत्या दोन दिवसांत त्याचीही तीव्रता वाढणार आहे. या तिहेरी परिस्थितीमुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
असा घसरला निफाडचा पारा
– 07 नोव्हेंबर 21.5 अंश सेल्सिअस किमान तापमान
– 08 नोव्हेंबर 16.5 अंश सेल्सिअस किमान तापमान
– 09 नोव्हेंबर 12.5 अंश सेल्सिअस किमान तापमान
– 10 नोव्हेंबर 11.1 अंश सेल्सिअस किमान तापमान
– 11 नोव्हेंबर 11 अंश सेल्सिअस किमान तापमान
(Rainfall in many parts of the state, cold in many parts, low temperature recorded in Niphad)
इतर बातम्याः
Good News: रानवाटेवर केशराचा पाऊस; भारतात दुर्मिळ झालेल्या लाल मानेच्या ससाण्याचे घडले दर्शन!
मतदार याद्यांमध्ये 48 हजार नावे दुबार; फोटो जुळल्याने फुटले बिंग, नाशिकचा घोळ निस्तारेना
Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’https://t.co/mThHQYOyX6#Marathwada|#HyderabadMuktisangram|#FreedomFighterAnantraoBhalerao|#Aurangabad|#Maharashtra|#Razakar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021