राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पुणे आणि नाशिकमध्ये रविवारी झालेल्या पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. यामुळे नाशिकमधील गोदावरी तर पुण्यातील मुळा-मुठा नदीला पूर आला आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील भागात पाणी शिरले आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भेट देणार आहे. राज्यात पावसाचा जोर अजूनही चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
नाशिकमध्ये गेल्या 24 तासांत 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिकच्या गोदावरीला हंगामातील पहिला पूर आला आहे. गोदा घाट परिसरातील दुतोंडी मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी गेली आहे. नाशिकमध्ये पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
#WATCH | Maharashtra: Various temples were inundated under the Godavari river in Nashik, following incessant rainfall in the region. pic.twitter.com/oHjGYbTvDs
— ANI (@ANI) August 5, 2024
पुण्यातील एकता नगर भागात अजूनही पाणी आहे. या ठिकाणाच्या सर्व नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी रविवारपासून एकता नगरमध्ये मुक्कामी आहेत. पुण्यात सध्या पावसाचे विश्रांती घेतली असली तरी एकता नगरमधील परिस्थिती जैसे थे आहे.
पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमधील पाहणी करत मुख्यमंत्री साधणार नागरिकांशी संवाद साधणार आहे. पुणे शहरात उद्धवलेल्या पूर सदृश्य परिस्थितीचा मुख्यमंत्री आज आढावा घेणार आहे. पाहणीनंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मुख्यमंत्री आढावा घेणार आहे.
पुणे शहरासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु हवामान विभागाने पुण्याला आजही ऑरेंज अलर्ट दिला आहे. रविवारी संध्याकाळ नंतर पुण्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. धरण क्षेत्रातून नद्यांमध्ये विसर्ग अद्याप ही सुरू आहे.
राज्यात अजून चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही भागांत यलो अलर्ट दिला आहे.
4 Aug: IMD ने महाराष्ट्रात पुढील ४,५ दिवस मुसळधार ते अतीमुसळधार+ पावसाचा इशारा दिला आहे.
अधिक तपशीलांसाठी कृपया भेट द्या.https://t.co/5CS4HYuOJYhttps://t.co/8BKq9ajLOn pic.twitter.com/Uix0OKSQ3N— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 4, 2024
गेल्या 24 तासांत कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी रविवारी सकाळी होती 39 फूट 11 इंच तर सोमवारी सकाळी पाणी पातळी 39 फूट आली आहे. गेल्या 24 तासांत फक्त 11 इंचने नदीचे पाणी कमी झाले आहे. गेली 5 दिवस कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 40 आणि 39 फुटावर स्थिर आहे. कृष्णा नदीची इशारा पातळी आहे 40 फूट तर धोका पातळी आहे 45 फूट आहे. सध्या कोयना धरणातून 50 हजार क्यूसेक्स आणि चांदोली धरनातून 10 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर अजूनही पाण्याखाली आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुठा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह अद्यापही सुरू आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे भाविकांना दर्शन घेता येत नाही. मंदिर प्रशासनाकडून अद्यावत पूजा विधी करण्यात आला आहे.