मुंबई: गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिका निवडणुकीचं (bmc) रणशिंग आज फुंकलं. राज ठाकरे यांनी तब्बल तीन वर्षानंतर शिवतिर्थावरून मनसे (mns) सैनिकांशी संवाद साधला. आज राज ठाकरे यांची तोफ धडाडली. नेहमीच्या आवेशात राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. पण हा हल्लाबोल करताना राज यांच्या तोफेचं तोंड हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दिशेने होतं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला करतानाच राज यांनी भाजपवर मात्र सोयीस्कर बोलणं टाळलं. उलट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केली. तसेच मराठीचा मुद्दा हाताळतानाच राज यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही जोर दिला. राज यांच्या भाषणात मराठीचा मुद्दा होता, पण मराठीच्या मुद्द्यापेक्षा त्यांचा सर्वाधिक जोर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होता. त्यामुळे राज ठाकरे मुंबईसह पुणे, ठाणे, नाशकातही भाजपसोबत युती करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राज यांच्या भाषणातील मनसे आणि भाजपच्या युतीसाठी पोषक असणारे पाच मुद्दे खालील प्रमाणे.
निवडणुकीत लाव रे तो व्हिडीओ म्हणून भाजपला अडचणीत आणणाऱ्या राज यांनी आज थेट भाजपचीच बाजू घेतली. राज यांनी आजच्या भाषणात भाजपची साथ सोडल्याने शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. निवडणुका झाल्यावर शिवसेनेला अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरल्याची उपरती झाली आणि ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्यासोबत गेले अशी टीका राज यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत सभा घेतल्या. त्यावेळी तुम्हीही त्यांच्यासोबत स्टेजवर होता. तेव्हा मोदींनी देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असं सांगितलं. अमित शहा यांनीही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील सांगितलं. त्यावेळी तुम्हाला अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला का आठवला नाही? असा सवाल राज यांनी केला. राज यांनी सडेतोड युक्तिवाद केला. भाजपच्या नेत्यांनाही आजपर्यंत असा बिनतोड युक्तिवाद केला नाही. राज हे जणू काही भाजप नेत्यांचीच भाषा बोलत होते, अशा पद्धतीने त्यांनी युक्तिवाद केल्याने राज हे भाजपसोबत जाऊ शकतात, असं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी मारण्यास सुरुवात केली आहे. आघाडीच्याच नेत्यांच्या घरावर धाडी मारणं सुरू आहे. त्यामुळे आघाडीतील नेते त्रस्त झाले आहेत. भाजप सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. पण राज यांनी या कारवायांचं समर्थन केलं आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री ठणकावून सांगत होते विधानसभेत माझ्या कुटुंबाला हात लावत असाल तर मला अटक करा. पहिल्यांदा कुटुंबाला सांग महापालिकेत जाऊ नको म्हणून. हे लोक पालिकेत जाऊन व्यवहार बघतात ते थांबवा आधी, असं राज म्हणाले. यांना ईडीची नोटीस आली. मलाही ईडीची नोटीस आली होती. मीही ईडीच्या चौकशीला सामोरे गेलो. यांना चार महिन्यापूर्वी नोटीस आली. गेले नाही. संपत्ती जप्त केली तेव्हा मुख्यमंत्र्यांना राग आला. तेव्हा म्हणतात कुटुंबावर येणार असेल तर मला अटक करा. हे सर्व 2019चं आहे. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं होतं ना भोगा. राजकारण तुम्हाला करायचं असेल तर राजकारण समोरच्या लोकांनाही येतं. या असल्या नादान राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, असं राज ठाकरे म्हणाले.
लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या राज ठाकरे यांनी आज सपशेल यूटर्न घेतला. आजच्या भाषणातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. मोदींनी झोपडपट्ट्यातील मदरश्यांवरही धाडी टाका. त्यातून बरंच काही हातू लागू शकतं, असं आवाहन त्यांनी मोदींना केलं. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही स्तुती केली. उत्तर प्रदेशचा निकाल लागला. तिथे विकास होतोय. हेच पाहिजे. मोदी सत्तेत आल्यावर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडकडे त्यांनी पहावं. या तीन राज्यातून लोक बाहेर पडतात हे मी 2014मध्ये बोलत होतो. तिकडे विकास होतोय हे ऐकून आनंद वाटतो. प्रत्येक राज्यात व्हाव. सर्वांचं ओझं घ्यायला महाराष्ट्र बसला नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
राज यांनी आजच्या भाषणात थेट मशिदीवरील भोंग्यावरून सरकारला टार्गेट केलं. मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा होता. राज यांनी हा अजेंडा आपल्या हातात घेतला. त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर थेट मशिदीसमोर हनुमान चालीसा सुरू करा असं जाहीर केलं. त्यामुळे मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या मुद्द्यावरून राज ठाकरे आपली हिंदुत्ववादी प्रतिमा अधिक गडद करणार असल्याचं दिसून येतं. एकीकडे शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत युती केल्याने त्यांच्या हातून हिंदुत्वाचा मुद्दा निसटला आहे. अशा वेळी राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणं युतीच्या पथ्यावर पडणारं आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
राज यांच्या आजच्या भाषणात ते भाजपवर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपवर टीका करतात की भाजपसोबत जाण्याची घोषणा करतात याबाबत सर्वांची उत्सुकता होती. पण या पैकी काहीच झालं नाही. राज यांनी युतीचीही घोषणा केली नाही, संकेतही दिले नाहीत. तसेच संपूर्ण सव्वातासाच्या भाषणात भाजपवर टीकाही केली नाही. उलट भाजपची स्तुती केली. भाजपला पूरक असंच भाषण केलं.
संबंधित बातम्या: